पवना धरणाचे मजबुतीकरण नऊ वर्षांपासून रखडले

0

पिंपरी-चिंचवड : शहराची जीवनदायिनी असणार्‍या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. मावळ परिसरातील शेतकर्‍यांचा विरोध असल्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणाचे काम रखडले आहे. पवना धरणाचे मजबुतीकरण झाले तर धरणाची साठवण क्षमता 1.48 टीएमसीने वाढणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातली अनेक गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणाच्या मजबुतीकरणाचे काम 2004 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, 2008 मध्ये मावळातील शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर हे काम थांबविण्यात आले आहे. मजबुतीकरणामध्ये धरणाची डागडुजी, देखभाल-दुरुस्ती, पाण्याची गळती रोखणे यासारख्या कामांचा समावेश होता.

बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार
केंद्र सरकारतर्फे सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्चित करण्याचे धोरण आखले गेले होते. त्यानुसार पुण्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयुआरएम) भविष्यकालीन पाण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना पुढे आली. पिंपर-चिंचवड शहराची 2041 मध्ये असणारी लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन करून 2008 मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार झाला. मात्र, त्याला मावळातील शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केला. त्यानंतर धरणाच्या मजबुतीकरणाचे कामदेखील थांबविण्यात आले आहे.

साठवण क्षमता 10.78 टीएमसी
हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी टर्बाईनचा वापर केला जातो. पाण्यावर विद्युतनिर्मिती केली जाते. सब स्टेशनवरून तळेगावसाठी वीज दिली जाते. पवना धरणाची साठवण क्षमता 10.78 टीएमसी आहे. धरणात 9.68 टीएमसी पाणी अडवले जाते. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम 2004 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, 2008 मध्ये मावळातील शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर ते काम थांबविण्यात आले आहे. धरण मजबुतीकरणाचे काम झाल्यास धरणाची साठवण क्षमता 1.48 टीएमसीने वाढेल, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जॉन बर्वे यांनी दिली.

गाळ काढल्याने साठवण क्षमता वाढली
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार्‍या पवना धरणातून गेल्या दोन वर्षांत 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत सुमारे सात कोटी 60 लाख लीटरने वाढ झाली आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकासनिधीतून सलग दोन वर्ष गाळ काढण्यात आला. मावळसह पिंपरी-चिंचवडकारांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणातील गाळ गेल्या 50 वर्षांत काढला गेला नव्हता. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झाला होता. पवना धरणातील अपुर्‍या पाणीसाठ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला उन्हाळ्यात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो.

75 हजार क्युबिक मीटर गाळ काढला
धरणातील गाळ काढण्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने तसेच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले होते. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. गेल्या वर्षी त्यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा धरणातील 39 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला होता. त्यानंतर यंदादेखील उन्हाळ्यात त्यांनी गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यंदा धरणातील 36 हजार क्युबिक गाळ मीटर काढण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत 75 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे सात कोटी 60 लाख लीटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे.