पवना धरणातून पाणी कमी उचला

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे हिवाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून, उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्र पाठविले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणी उपसा सुरु असून तो थांबवावा, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेस मावळातील पवना धरणातून पिण्याचे पाणी पुरविले जाते.

30 दलघमी केला जादा उपसा
धरणातून नदीत सोडून हे पाणी रावेत येथील जलउपसा केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यात नेले जाते. तेथून जलवाहिन्यांतून नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. धरणातून आजमितीला दिवसाला 470 दशलक्ष धनमीटर पाणी उचलले जाते. आवश्यकता वाटल्यास जलसंपदा विभागाच्या परवानगीने अतिरिक्त पाणी उचलले जाते. गेल्यावर्षी याच कालावधीत 440 ते 450 दलघमी पाणी उपसा केला जात होता. यंदा मात्र, त्यात वाढ झाली असून तो 470 ते 480 दलघमी झाला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

धरण भरल्याने मुबलक पाण्याची अपेक्षा
दरम्यान, पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा 100 टक्के भरले होते. त्यामुळे शहरवासियांना मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, शहराच्या विविध भागात कमी दाबाने, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सत्ताधा-यांसह विरोधक करत आहेत. उपमहापौर शैलजा मोरे यांच्या प्रभागातील देखील गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नव्हता. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. तक्रार केल्यानंतर संबंधित भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.