पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण मावळ तालुक्याची पाण्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणामध्ये केवळ २१.३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी शहराला 40 दिवस पुरु शकते. मात्र 4० दिवसानंतर काय असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडणार आहे. जून महिन्यात पाऊस सुरू होत असतो. यावर्षीही पावसाचे वेळेवर आगमन झाले आहे. काही दिवस सतत पडून गेल्यावर जणू तो गायब झाला आहे. पावसाचे वातावरण दिसत असते, मात्र पाऊस हुलकावणी देतो आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला पवना धरणात २१.३५ टक्के पाणीसाठा असून हा पाणीसाठा आणखीन 40 दिवस पुरेल एवढा आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात दरवर्षी जून महिन्याचे पहिले पंधरा दिवस चांगला पडतो. परंतु यावर्षी परिस्थिती मात्र उलट आहे. यंदा एक जूनच्या दरम्यान पाऊस पडला. त्यानंतर मात्र सगळीकडे पाऊस पडत होता आणि शहरात व धरण क्षेत्रात मात्र नुसतीच रिमझिम सुरू होती.