शहराला केवळ 45 दिवसच पुरेल
पिंपरी : जून महिन्यात पाऊस सुरू होत असतो. यावर्षीही पावसाचे वेळेवर आगमन झाले आहे. काही दिवस सतत पडून गेल्यावर जणू तो गायब झाला आहे. पावसाचे वातावरण दिसत असते, मात्र पाऊस हुलकावणी देतो आहे. राज्यात मान्सून दाखल होऊन देखील एक आठवडा होत आला आहे. शहरात आणि धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अशीच ओढ दिली तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणार्या पवना धरणामध्ये केवळ 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. हे पाणी शहराला केवळ 45 दिवस पुरू शकते. मात्र 45 दिवसानंतर काय असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडणार आहे.
धरणाची पातळी खालवली
पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरामध्ये दरवर्षी जून महिन्याचे पहिले पंधरा दिवस चांगला पडतो. यावर्षी मात्र उलट परिस्थिती दिसून येते आहे. एक जूनला पावसाने जोर दाखवल्यानंतर नागरिकांना वाटले होते की यंदाचा पावसाळा जोरदार असेल. त्यानंतर मात्र सगळीकडे पाऊस पडत होता आणि शहरात व धरण क्षेत्रात मात्र नुसतीच रिमझिम सुरू होती. आठ ते अकरा जून दरम्यान हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याचा सावधानतेचा इशारा दिला होता. या दरम्यान देखील ढग केवळ आले आणि गेले म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. शहरवासियांना पिण्याचे पाणी देणारा एकमेव स्त्रोत असलेल्या पवना धरणाची पातळी देखील खालावत चालली आहे.
पावसाळा उत्तम असल्याचा अंदाज
हवामान खात्याने यंदा मान्सून 95 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. खासगी हवामान संस्थांनी देखील पावसाळा उत्तम राहणार असल्याचे सांगितले आहे. पावसाने मात्र ओढ दिली आहे. ढग रोज येऊन हुलकावणी देत असल्याने शहराच्या सीमेवर व मावळ परिसरात असलेले शेतकरी देखील आता हवालदिल होऊ लागले आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे एक जूनपासून पवना धरणक्षेत्रात केवळ 64 मिमी पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी 14 जून रोजी धरणात 23 टक्के पाणीसाठा होता परंतु त्यावेळी पाऊस सुरू झाला असल्याने चिंता नव्हती. यावर्षी मात्र पाऊस सतत हुलकावण्या देत असल्याने सध्या चिंतेचे ढग आहेत.
विश्लेषण तंतोतंत खरे
आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार गेल्या काही वर्षात पावसाचे आकडे जरी सरीसरीपर्यंत पोहचत असले तरी कोरड्या दिवसांची संख्या अधिक वाढली आहे. तसेच मान्सूनच्या काळा व्यतिरिक्त वर्षभरात पडणारा अवकाळी पाऊस ही कमी झाला आहे. विश्लेषकांनी हे विश्लेषण संपूर्ण देशासाठी केले असले तरी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला यावर्षी तरी हे विश्लेषण अगदी तंतोतंत लागू होत आहे. वर्षभरात होणार्या एकूण पावसापैकी 80 ते 90 टक्के पाऊस पावसाळ्यात पडतो आणि 10 ते 20 टक्के पाऊस हा उरलेल्या काळात पडत असतो. 2018 सालात अवकाळी पावसाने ही शहराकडे आणि शहराला पाणी देणार्या धरण पाणलोट क्षेत्राकडे पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे. यंदा अंदाजांच्या विपरीत जाऊन पाऊस कमी झाल्यास पाणी टंचाई निर्माण होऊ शकते कारण आता धरणात केवळ 45 दिवस पुरेल एवढेच पाणी उरले आहे. त्यामळे पाणी जपून वापरण्याची वेळ ऐन पावसाळ्यात येऊ नये.