पवना धरणात सापडला दुर्मिळ मासा

0

कामशेत : पवना धरणामध्ये मासेमारीसाठी जाणार्‍या मच्छिमारांना अ‍ॅलीगेटर हा दुर्मिळ मासा सापडला. माणसासह धरणातील अन्य माशांना घातक आहे. या माशाचे तोंड मगरी सारखे असून, मागील भाग माशासारखा आहे. प्रथम या माशाला पाहून मच्छिमार घाबरले. मात्र हा मासा मृत असल्याची खात्री झाल्याने त्यांनी त्याला घरी आणले. हा मासा पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करीत आहेत. तर जलचरांसाठी धोकादायक असलेला हा मासा धरणात आला कसा असा प्रश्‍न तज्ज्ञांना पडला आहे. पवना धरणामध्ये महेश तारू यांनी मंगळवारी जाळे लावले. बुधवारी ते काढण्यासाठी गेले असता जाळ्यात त्यांना दुर्मिळ तीन किलोचा गार प्रजातीचा अलिगेटर मासा दिसला. या माशाचे तोंड मगरी सारखे तीक्ष्ण, दात, जीभ, पाठीचा भाग तीव्र टणक, डोळे, नाकपुड्या आदी असल्याने सुरुवातीला ती मगर असल्याचे त्यांना वाटले. मात्र हा मासा त्यांनी निरखून पहिला असता हा वेगळाच व दूर्मिळ मासा असल्याने आणि हा आपल्या भागात मिळत नसल्याने त्यांनी उत्सुकतेपोटी घरी आणला.