पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच दिवसाआड पाणीकपात रद्द होणार; महापौर राहुल जाधव यांची माहिती

0

पिंपरी चिंचवड : पवना धरण 100 टक्के भरल्यानंतरच पिंपरी चिंचवड शहरातील दिवसाआड पाणी कपात रद्दचा निर्णय घेतला जाईल, असे पालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी गुरुवारी सांगितले. पाणी कपातीबाबत गटनेत्याची बैठक झाली नाही. मात्र, महापौर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. झालेल्या चर्चेबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महापौर जाधव म्हणाले की, धरणात पाणी साठा कमी असल्याने फेब्रुवारीपासून महापालिकेने शहरात आठवड्यातून एकदा पाणीकपात सुरू केली. पाणीसाठा आणखी खालविल्याने मार्चपासून दिवसाआड पाणीकपात लागू करण्यात आली. सध्या दररोज 410 एमएलडी पाणी रावेत बंधारातून उचलले जात आहे.

धरण भरले 86 टक्के…
सध्या शहर आणि पवना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण 86 टक्के भरले आहे. धरण परिसरात पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे लवकरच धरण 100 टक्के भरेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर दिवसाआड पाणी कपात रद्दचा निर्णय घेतला जाईल. दिवसाआड पाणीकपातीमुळे शहरातील नागरिक आनंदीत आहेत. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असून, पाणी टंचाईच्या तक्रारी कमी झाल्या आहेत, असा दावा महापौर जाधव यांनी केला.
धरण 100 टक्के धरण भरल्यानंतर पवना माईचे जलपूजन केले जाईल. त्यानंतर पाणीकपात मागे घेऊन 15 ऑगस्टपासून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयास आयुक्तांनी सहमती दिल्याचे त्यांनी सांगितले.