पवना धरण 93.47 टक्के भरले

0

पिंपरी-चिंचवड : मावळ परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 93.47 टक्के भरले आहे. यामुळे शहरवासीयांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गुरुवारी दिलेल्या आकडेवारीनुसार हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे 1 हजार 394 क्युसेक या वेगाने धरणातून नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

धरणातून पाण्याचा जोरदार विसर्ग
धरणातील उपयुक्त पाणीसाठा 7.947 टीएमसी आहे. बुधवारी दिवसभरात 28 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एक जूनपासून आजपर्यंत 2 हजार 126 मि.मी. पाऊस पवना धरण परिसरात झाला आहे. मावळसह पिंपरी-चिंचवडकारांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पवना धरण परिसरात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पाण्यात वाढ झाल्यामुळे सोमवारपासून हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे 1394 क्युसेक या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. पावसाची परिस्थिती पाहून पाणी सोडण्याचा वेग कमी-जास्त केला जात आहे.

ऑगस्टपूर्वीच भरले धरण
दरवर्षी पवना धरण 15 ऑगस्टपर्यंत भरते. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा 2 मे पासून पाणीकपात केली होती. त्यामुळे 1 जून रोजी धरणात 20.28 टक्के इतका पाणीसाठी शिल्लक होता. यंदा पाऊस चांगला झाल्याने 27 जुलै रोजी धरण 93.47 टक्के भरले आहे. यामुळे मावळसह, पिंपरी-चिंचवडकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच पावसाची अशीच संततधार सुरु राहिल्यास जुलैअखेर धरण 100 टक्के भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.