पिंपरी-चिंचवड : थेरगाव, काळेवाडी परिसरात पवना नदीच्या पात्रालगत भंगार व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. ही दुकाने बेकायदा सुरू असून, भंगार व्यवसायामुळे पवना नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. भंगार व्यावसायिकांकडून प्लास्टिकचे साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच इतर भंगारातील साहित्य याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे येथे कचर्याचे मोठे ढिग साचले असून, त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने पवना नदी पात्रालगतची सर्व भंगाराची दुकाने बंद करावीत, अशी मागणी शिवसेनेचे रहाटणी-काळेवाडी प्रभागप्रमुख युवराज दाखले यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनदेखील दिले आहे.
महापालिकेने कारवाई करावी
निवेदनात म्हटले आहे, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पवना नदी पात्रालगत अनेक भंगार दुकाने सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात प्लास्टिक पिशव्या तसेच कचर्याचे ढिग मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. नदी पात्रालगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत आहे. या भंगार दुकानांमुळे रोगराई पसरणार असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीपात्रालगत भंगार व्यावसाय करण्यास महापालिकेने मनाई करावी. तसेच सध्या नदीपात्रालगत असलेल्या भंगार दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.