पवन मावळातील एकच मुलगी असणार्‍या महिलांचा सत्कार

0
सत्कारात महिलांना साडी आणि चिमुकल्यांसाठी ड्रेस तसेच मिठाई देऊन केला सन्मान
इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी स्टारवतीने राबविला उपक्रम
शिरगाव :  पवन मावळमधील एकुलती एकच मुलगी असणार्‍या महिलांचा सन्मान सोहळा येथे नुकताच पार पडला हा कार्यक्रम इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी स्टारवतीने घेण्यात आल्याची माहिती सांगवडे जी.प. शाळेचे मुख्याध्यापक संदीप सकपाळ यांनी दिली. या कार्यक्रमात वैजयंती नलावडे-परंदवाडी, वनमाला ढवळे-परंदवाडी, स्मिता भारंबे-सोमटणे, सारिका कडूसकर-गोडुंबरे, सुप्रिया बोडके-साळुंब्रे, सारिका सावंत-गोडुंबरे या एकच मुलगी असणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार या क्लबच्या प्रेसिडेंट किरण गुप्ता व डिस्ट्रिक्ट चेरमन रेणुजी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कारात महिलांना साडी, मुलींसाठी ड्रेस आणि मिठाई देण्यात आली. उपस्थित सर्वांनी या महिलांच्या धाडसाचे कौतुक करीत हे समाज परिवर्तन आहे असे सांगितले.
स्वसंरक्षणाचे धडे देणार 
यावेळी मनोगत व्यक्त करताना या महिला म्हणाल्या की, ग्रामीण भागात रहात असतानाही आम्ही एकाच मुलीचा विचार केला. सध्या मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. त्यामुळे आमच्या मुली देखील काही छान करून दाखवतील यात शंका नाही. मुली या खुप हुशार असतात. त्या छान शिकतील आणि आपले नाव मोठे करतीलच. मुलगा पाहिजे असा हट्ट घरून कोणी धरला नाही. घरातल्या लोकांच्या पाठबळामुळेच असा निर्णय घेऊ शकलो. त्यातही मुलगी आहे याचा सर्वांनाच आनंद आहे. सगळ्यांकडून या मुलींचे खुप कौतुक होते. रोजच आपण मुलींवरील अत्याचार्‍याच्या बातम्या वाचत असतो. त्यामुळे भिती वाटते. पण आम्ही आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडेही देणार आहोत. ज्यामुळे त्या आत्मविश्‍वासाने आलेल्या संकटाचा सामना करू शकतील.
महिलांचे कौतुकच आहे
यावेळी किरण गुप्ता म्हणाल्या की, एकच मुलगी होवू देणे म्हणजे समाज परिवर्तनाच्या गप्पा मारणाच्या फार सोपे आहे. अशा गोष्टी सांगणे सोपे असते, करणे फार अवघड. या महिलांनी हे करून दाखवले आहे म्हणून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आज जग किती पुढे आहे आणि आपण वंशाला दिवा पाहिजेच्या नावाखाली कुटुंब वाढवत चाललो आहोत. आपल्याच हाताने आपल्या कुटुंबाची वाताहत करत आहोत. कारण महाराष्ट्रात जास्तीत जास्त घरात एकच जण कमावतो आणि बाकी त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे खाणारे जास्त आणि कमावणारे कमी होतात. त्यामुळे मुल जास्त असले की त्यांना हवे तसे शिक्षण देता येत नाही. याचा राग आपण कुटुंबावर काढतो. त्यामुळे एकच मुलगा किंवा मुलगी असणे हे सुखी आणि आनंदी कुटुंबाचे लक्षण आहे. त्यात जर एकच मुलगी असेल तर त्या कुटुंबाचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. आमच्या क्लबच्या माध्यमातून आम्ही ते केले. असे सर्वांनीच केल तर देश पुढे जाण्यास वेळ लागणार नाही.