शिरगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दि. 7 नोव्हेंबर हा शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शिरगाव, दारुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, गहुंजे, गोडूंब्रे, कासारसाई आदी गावांत सर्वच माध्यमाच्या शाळेत हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धा घेऊन मुलांना खाऊचे वाटप करण्यात आला.
तसेच स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. शिरगाव येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धा घेतल्या. विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेबांविषयी आपले विचार व्यक्त केले. प्राचार्य रमेश फरताडे यांनी डॉ. आंबेडकरांचा सर्व शिक्षण प्रवास उलगडून सांगितला. दारुंब्रेचे केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे यांनी शाळेस भेट देऊन या दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक नारायण पवार, विजय लोखंडे, शोभा महाजन, संदीप सपकाळ, राजेंद्र लासूरकर, रमेश फरताडे यांनी नियोजन केले.