छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. ते केवळ भोसल्याचे नव्हते. ही बाब जितकी सोळाआणे खरी आहे; तितकीच महाराष्ट्र राज्याचा सुवर्णकलश आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आश्वासित केलेले ‘हे राज्य मराठी असेल, मराठ्यांचे नसेल‘ हे वचनही पाळणे मराठी मातीतील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यातील जाणकार नेते शरदराव पवार यांना त्यांचे राजकीय गुरु असलेल्या यशवंतरावांच्या उपरोक्त वचनाचा सद्या विसर पडलेला दिसतोे.
काल-परवा पवारांनी बोलता बोलता पुन्हा एकदा ब्राम्हणविरोधाची धार तीव्र केली. निवडणुका आल्या किंवा फार काळ सत्तेपासून दूर जावे लागले की पवारांना स्वतःची जात आठवत असते; आणि ब्राम्हणविरोधही आठवत असतो. त्यांचे पुण्यातील भाषण पाहाता, या दोनपैकी एक काही तरी होत आहे. एक तर निवडणुका तरी आल्या असाव्यात; किंवा पवारांचा जीव सत्तेवाचून तडफडू लागला असावा. पवार तसे फार क्वचित बोलतात. कमी बोलणे आणि जास्तीत जास्त कृती करणे ही पवारांची खास पद्धत आहे. तथापि, पवार जे बोलतात ते सूचक असते. कधी कधी ते भयसूचकही असते. खरे तर शिवाजी महाराज आणि ब्राम्हण संबंधांबाबत प्रचंड विवाद आहेत. त्यातीलच शिवाजी महाराज गो-ब्राम्हण प्रतिपालक नव्हते हा जो वाद पवारांनी काल-परवा उकरून काढला, त्यामुळे मराठा-ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर वादाची ठिणगी पडणार आहे. महत्वाचे म्हणजे, शिवाजी महाराज गो-ब्राम्हण प्रतिपालक होते किंवा नव्हते यावरून महाराजांची राजनीती ठरविणे अशक्यप्राय आहे. निरर्थकही आहे. तरीही या वादाला फुंकर घातली जाते. आता तर ती खुद्द पवारांनीच घातली आहे. पवार हे जातीयवादी नसल्याचे दाखवित असतात. परंतु, ते तितकेसे खरे नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यातील अनेकांना पोटदुखी झालेलीच आहे. परंतु, आजपर्यंतच्या इतक्या आंदोलनांना खतपाणी घालूनही राजकीय यश पदरी पडत नसल्याने पवारांना नैराश्य आलेले दिसते; आणि त्या नैराश्यातूनच त्यांनी ब्राम्हण-मराठा आणि ब्राम्हणेतर वादाला पुन्हा चेतविण्याचे काम करण्याचे ठरवलेले असावे. छत्रपतींच्या खांद्यावर बंदूक ठेवून पवारांनी ब्राम्हणांविरोधात निशाणा लावला असला तरी, छत्रपतींचे राजकीय कर्तृत्व पवारांना चांगलेच ठावूक आहे. त्याला बगल देऊनच त्यांना जातीय राजकारणातून आपल्या पक्षाला ऊर्जितावस्था द्यायची आहे. जेव्हा जेव्हा पवार सत्तेतून बाहेर जातात तेव्हा सत्तेचे दार पुन्हा उघडण्यासाठी ते जातीयवादाचा आधार घेत असतात, असा सर्वांचा पुर्वानुभव आहे.
आतादेखील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शाळेत शिकविला गेलेला इतिहास चुकीचा आहे. एका विशिष्ट जातीने चुकीचे ज्ञानदान करून बहुजन समाजाची दिशाभूल केली असे सांगताना पवारांना ब्राम्हणविरोधच आळवायचा होता हे अगदीच स्पष्ट होते. त्यामुळे महाराज हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते हे अनैतिहासिक आहे, असे त्यांनी जाहीर करून टाकले. खरे तर पुण्यातील श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्यानिमित्ताने पवारांच्या तोंडून कोकाटेच बोलत होते. किंबहुना, मराठा सेवासंघ आणि संभाजी ब्रिगेडला जे बोलायचे होते ते त्यांनी पवारांच्या तोंडून वदवून घेतले, असाच त्याचा अर्थ ध्वनित होतो. बाबासाहेब पुरंदरेसारख्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिला असेल. किंबहुना, पुरंदरेंनी लिहिलेला इतिहास खोटाच आहे हे अनेक मराठासह ब्राम्हण इतिहासतज्ज्ञांनी सहपुरावे सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे खर्या इतिहासावरील जळमटे दूर झालीच आहे. राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकाही विपरित परिस्थितीत स्वराज्य उभे करू पाहणार्या कोणत्याही अलौकिक राजपुरुषाचीच होती. स्वराज्यनिर्मितीच्या कामात त्यांना मदत करणारे, साथ देणारे निव्वळ मराठेच नव्हते. तर बारा बलुतेदार, अठरापगड जातीची माणसे, ब्राम्हण आणि मुस्लीमदेखील होती. कारण, ते जे राज्य निर्माण करत होते. ते सर्वांचे-रयतेचे राज्य होते. या स्वराज्याआड येणार्या सर्वांना त्यांनी शत्रू समजले आणि कापून काढले. मग् तेथे स्वकीय-परकीय असा भेद केला नाही. ब्राम्हण किंवा मुस्लीम असाही भेद केला नाही. अफजल खानाचा कोथळा काढताना त्यांनी तो मुस्लीम आहे म्हणून नव्हे तर स्वराज्याचा शत्रू म्हणून त्याचा कोथळा काढला. सोबतच त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी हादेखील कापून काढला होता. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जात-धर्म या बाबी कधीच महत्वाच्या नव्हत्या. स्वराज्याची उभारणी करताना त्यांनी या बाबींचा कधीच विचारही केला नव्हता. छत्रपतींनी स्वकष्टाने स्थापन केलेले स्वराज्य पुढे पेशवाईच्या ताब्यात कसे आले आणि त्याचा अस्त कसा झाला? हे महाराष्ट्राला माहित आहे. तेथे काय तो दोषारोपणचा मुद्दा येऊ शकतो. परंतु, छत्रपतींचे नाव घेऊन जातीयवादी विचारांची पेरणी करता येणे शक्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार जर तशी पेरणी करत असतील तर तो त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग असून, दोन जातीत तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचाच तो प्रयत्न होय. इतिहास चुकीचा शिकवला गेला हे खरे आहे; परंतु सांस्कृतिक असलेल्या मुद्द्यांना राजकीय वळण देऊन पवार नेहमीप्रमाणे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम करत आहेत, हे कळून येते. त्यांची ही खेळी महाराष्ट्राच्या निकोप आरोग्यासाठी तशी अजिबात चांगली नाही. राज्याचा मुख्यमंत्री ब्राम्हण आहे, अन् या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चाणाक्षपणे पवारांची अनेक संस्थाने खालसा केली आहेत. ज्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पवारांचा शब्द प्रमाण असायचा, त्याच शहरांत आता मुख्यमंत्र्यांनी मोदी लाटेचा पुरेपूर फायदा उचलत कमळ फुलवले आहे.
पवारांच्या राजकीय शक्तिस्थानांवर हल्ले करून फडणवीस यांनी त्यांना निष्प्रभ केले. फडणवीस आणि मोदींसारखे अगदी नवे नेते जेव्हा पवारांसारख्या ज्येष्ठ आणि जाणकार नेत्याला अस्वली गुदगुल्या करू लागतात तेव्हा कासावीस झालेल्या पवारांना आपल्या मराठा जातीचा आधार घ्यावा वाटतो. बरे, हा आधार घेताना ब्राम्हणविरोधाचे हुकमी शस्त्रही भात्यातून बाहेर काढावे लागते. परंपरागत राजकारणाची ही पद्धत आता पवारांनी बदलायला हवी. एकीकडे समभावाच्या गप्पा मारून मुस्लीमांना जवळ करायचे आणि दुसरीकडे ब्राम्हण समाजाला शिवरायांचे खरे शत्रू म्हणून लोकांसमोर उभे करायचे, असे वागणे पवारांना शोभणारे नाही. वर्णवर्चस्ववादी वृत्तीचा विरोध केला पाहिजेत. जे विषमतेचे समर्थक आहे, लोकशाहीविरोधी आहेत आणि ब्राम्हणवादाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचाही अगदी कडाडून विरोध केला पाहिजे. परंतु, राजकीय पटलावर जातीयवादी विचारांची विषपेरणी करून कुणी राजकारण साधत असेल तर त्यांचाही धिक्कार केला पाहिजेत. कालच्या पुण्यातील विधानामागे पवारांचा हेतू शुद्ध नव्हता. त्यांनी मांडलेल्या विचारांत तथ्य होते, परंतु त्या विचार मांडणीमागे जातीय राजकारणाला पुन्हा फुंकर घालून महाराष्ट्र पेटविण्याचा त्यांचा डाव आहे. पवारांचा हा डाव प्रत्येकाने वेळीच लक्षात घ्यायला हवा!