पवारांच्या आग्रहानंतरही देवकरांचा जळगाव लोकसभेसाठी नकार

0

अनिल भाईदास पाटील, वसंतराव मोरे व प्रमोद पाटील तिघांच्या नावावर चर्चा
लोकसभा निवडणुक मोर्चेबांधणीसाठी खा. शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक
जळगाव । जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असली तरी यातील प्रमुख आणि मातब्बर दावेदार मानल्या जाणार्‍या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा कानावर हात ठेवले आहे. देवकरांनंतर तीन इच्छुक उमेदवारांच्या नावावर आज झालेल्या बैठकित चर्चा करण्यात आली. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आज पुणे येथे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती होस्टेल येथे सकाळी बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ, माजी मंत्री विजयसिंह मोहितेपाटील हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक, माजी आ. दिलीप वाघ, राजीव देशमुख, अनिल भाईदास पाटील, प्रमोद पाटील, नामदेव चौधरी उपस्थित होते.

माजी मंत्री देवकरांना पवारांकडून विचारणा:
जळगाव लोकसभेसाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाची शिफारस जिल्हा नेत्यांनी आजच्या बैठकित केली. त्यामुळे खुद्द खा. शरद पवार यांनीही त्यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आग्रह केला. त्यावर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नकार देत ‘विधानसभाच बरी’ असे सांगितले. या जागेसाठी देवकरांना सुरवातीपासुनच आग्रह केला जात आहे. मात्र त्यांच्याकडुन पुन्हा एकदा नकार आल्याने माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे, अनिल भाईदास पाटील व प्रमोद पाटील या तिघांच्या नावावर चर्चा करण्यात आली.