भाजप नेतृत्वाने हालचाली सुरू, महिन्यास अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात होणार खांदेपालट
नवी दिल्ली – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता दिल्लीस्थित वरिष्ठ राजकीय सूत्राने वर्तविली आहे. नुकतेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रीय जनता दल (संयुक्त)ला केंद्रात मंत्रिपद देण्यात येण्याची शक्यता असून, तामिळनाडूत पुन्हा एकत्र आलेल्या अन्ना द्रमुक (एआयडीएमके) पक्षाचाही एनडीएत समावेश होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाणार आहे. दिल्लीस्थित सूत्राच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पॉवरफुल नेते शरद पवार यांनाही एनडीएत सहभागी करून घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने हालचाली गतिमान केल्या आहेत. बिहारमध्ये करण्यात आलेल्या राजकीय प्रयोगाची पुनर्रावृत्ती महाराष्ट्रातही करण्याचे भाजप नेतृत्वाच्या डोक्यात घोळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीएमध्ये सहभागी करून पवारांना वरिष्ठ मंत्रिपद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. तर शिवसेनेसोबत काडीमोड घेण्यासाठी भाजपच्या एका गटाचा दबाव वाढला आहे. डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विदेश दौर्यावर जाणार असून, तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या खांदेपालटला मूर्तरुप दिले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा पितृपंधरवडा सुरु होत असल्याने हा खांदेपालट याच महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचेही सूत्र म्हणाले.
चार मंत्रिपदे देण्याचे निश्चित, दोन जेडीयूच्या वाट्याला
आता चार मंत्रिपदे देण्याचे निश्चित सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळ फेरबदल निश्चित करण्यात आला आहे. दोन-चार दिवसांत बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयूप्रमुख नीतीश कुमार हे दिल्लीला येणार असून, ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. कुणाला केंद्रात मंत्री करावे, याबाबत हे दोन नेते चर्चा करणार आहेत. शिवाय, एआयडीएमकेच्या एकत्रिकरणामुळे हा पक्षदेखील एनडीएत येणार असून, त्यांच्याशी अमित शहा चर्चा करणार आहेत. त्यांचे 50 खासदार संसदेत असल्याने त्यांना चार मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. तर जेडीयूला दोन मंत्रिपदे दिली जाणार असल्याचेही सूत्र म्हणाले.
अमित शहांकडून अंतिम यादी तयार!
भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे उद्या चेन्नईला रवाना होणार होते. परंतु, त्यांना राजधानी दिल्लीतच थांबविण्यात आले होते. शहा हे ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर चर्चा करत होते. त्यांनी अंतिम यादी निश्चित केली असून, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली होती, अशी माहितीही सूत्राने दिली. यापूर्वी 18 ते 20 ऑगस्टदरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाचे निश्चित झाले होते. परंतु, राष्ट्रपती निवडणुकीमुळे ही तारीख टळली होती.