राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली; विरोधकांचे सर्व उमेदवार रिंगणात
बारामती : येत्या 26 तारखेला बारामती तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. काटेवाडी या ग्रामपंचायतीची लढत अतिशय अटीतटीची चालू आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यक्तिश: लक्ष घालावे लागत आहे. विरोधकांनी सर्व उमेदवार उभे केल्याने सत्ताधार्यांना ही निवडणूक चांगलीच त्रासदायक ठरत असून, एकाच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असला तरी भाजपपुरस्कृत पॅनलला नागरिकांची चांगलीच उपस्थिती होती.
बिनविरोधचा काटेवाडीला फटका
काटेवाडी ग्रामपंचायत गेली दहा वर्षे बिनविरोध होत आहे. त्यामुळे आपल्या वॉर्डातील सदस्य कोण? हेच नागरिकांना समजत नव्हते. कारण बिनविरोध निवडणूक झाल्याचा एक मोठा तोटाच काटेवाडी ग्रामपंचायतीत दिसून आला आहे. बिनविरोध निवडून दिल्यामुळे सदस्य वॉर्डातील कामेच करीत नाहीत व आम्ही बिनविरोध निवडून आलो आहेत. त्यामुळे आमची फार जबाबदारी नाही. अशी उत्तरे दिली जातात असे नागरिकांनी बोलताना सांगितले. बिनविरोध निवडीचा हा कंगोरा नव्यानेच समोर आला आहे. छोट्या छोट्या कामासाठीसुध्दा ग्रामस्थांना हेलपाटे घालावे लागतात, असाही ग्रामस्थांचा अनुभव समोर आला आहे. बिनविरोध निवडणूक ही योग्य वाटत असली तरी सदस्यांचा बेजबाबदारपणा जाणवण्याइतपत आहे, असेही दिसून येत आहे.
गावागावात रंगले पक्षीय राजकारण
पारवडी येथील ग्रामपंचायतीतही राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल व भाजपपुरस्कृत पॅनल यांच्यात चांगलीच लढत होत आहे. याठिकाणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांचे नेतृत्व पणाला लागत आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलीच तयारी केली असून, प्रचारात तरुणांनी आघाडी घेतली आहे. गेली 35 वर्षे पारवडी ग्रामपंचायत बाळासाहेब गावडे यांनी आपल्या ताब्यात ठेवली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काय होणार याची चांगलीच उत्सुकता लागली आहे. गावात फेरफटका मारला असता दोन्ही पक्षांचा मतदारांवर दबाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ फार काही बोलण्यास तयार नाही. गावाचा विकास झाला की नाही? हा प्रश्न त्यामुळे बाजूला पडला आहे. केवळ पक्षीय राजकारण गावात रंगत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामस्थांच्या लागल्या पैजा
मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अर्थपूर्ण रणनीती आखली जात आहे. दोन्ही उमेदवार आर्थिक प्रबळ असल्याकारणाने मतदार लक्ष ठेवून आहेत. काटेवाडी या ठिकाणी भाजपचे पॅनल हे आर्थिकद़ृष्ट्या कमकुवत असल्याचे जाणवत आहे. काटेवाडीत काय होणार? याविषयी ग्रामस्थांमध्ये पैजा लागलेल्या आहेत.