मुंबई : मी खासदार झालो ते त्यांच्या पाठिंब्यानं झालो, असं शरद पवारांनी सांगितलं. पण हे धादांत खोटं आहे, पवारांनी एवढंही खोटं बोलू नये अशी जोरदार टीका प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर निशाना साधला. मी जेव्हा खासदार झालो त्यावेळी माझा समझोता त्यावेळचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी झाला होता. शरद पवार यात कुठेच नव्हते, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मला मुरली देवरा म्हणाले पवार यांना भेटायचं आहे, ते राजगृहावर भेटायला आले होते, मी त्यांना म्हणालो होतो की, तुम्ही काँग्रेसशी चर्चा करा. शरद पवार यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाहीये. त्यांच्या यानंतरच्या वक्तव्याला उत्तर देणार नाही. त्यांनी वैयक्तिक पातळीवर उतरू नये असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
आंबेडकर यांनी राफेल डीलकडे वळवला मोर्चा
काँग्रेस सरकारच्या काळात एका राफेल विमानाची किंमत 712 कोटी रुपये होती, भाजपाने ती 1600 कोटी रुपये केली. अचानक एवढी किंमत कशी वाढली हा प्रश्न आहे. उत्पादन फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स करणार, मात्र हे विमान कायम रेडी टू यूज ठेवण्याची किंमत 1 लाख कोटी रुपयांवर जाणार आहे अशी माझी माहिती आहे. सरकारी कंपनी एचएएलला काढून रिलायन्सला हे काम दिले. सरकारने राफेलची रेडी टू यूज किंमत किती असेल हे सांगायला हवे एचएएलकडे काम दिले असते तर ती किंमत किती असती आणि रिलायन्सला काम दिल्याने किंमत किती आहे हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
त्यासोबतच दरवर्षी विमान घेतल्यावर रिलायन्सला देखभालीसाठी 1 लाख कोटी रुपये मोजावे लागतील. रिलायन्स ही विमान रेडी तू युज अशी ठेवतील याची गॅरंटी कोण देणार?, रिलायन्सकडे टेक्नॉलॉजी नाही, फ्रान्स सरकारने गॅरंटी दिली का की युद्ध झालं तर विमान रेडी टू युज वापरू शकतो? तर असं झालं नाही, हे डील डिफेन्सचा विरोधात आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी केली