पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी आक्रमक

0

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाशी संबंध असलेल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चालगलीच आक्रमक झाली आहे. फडणवीस फॉर सीएम नावाच्या फेसबुक पेजवरून पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या त्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाचा आम्ही धिक्कार करत असून त्याच्याविरोधात न्यायालयीन कारवाई केली जाणार आहेच शिवाय मुख्यमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्र परिषदेमध्ये केली. शरद पवार यांच्याविषयी फडणवीस फॉर सीएम या विकृत मनोवृत्तीची पोस्ट टाकण्यात आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी संताप व्यक्त केला. फेसबुकवर आलेल्या त्या आक्षेपार्ह पोस्टबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली आहेच शिवाय पक्षाच्यावतीने यावृत्तीविरोधात कडक पावले उचलली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भीमा कोरेगावमध्ये जी घटना घडली त्याबद्दल काही जातीयवादी लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण तयार केले. सरकारने न्यायालयीन चौकशी सुरु केली आहे. मात्र राज्याचे गृहराज्यमंत्री सोशल मिडियाला दोष देत बसले आहेत. त्याअगोदर खोलात जावून चौकशी करायला हवी होती त्यावेळी केली नाही आणि आता अपयश आल्यावर दुसऱ्यावर खापर फोडले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याची आवश्यकता होती परंतु तसे करण्यात आले नाही असेही सुनिल तटकरे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. कर्जमाफीचा मुद्दा प्रलंबित आहे. या मुद्दयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ ते १२ डिसेंबरला हल्लाबोल पदयात्रा काढली. या हल्लाबोल पदयात्रेनंतर झोपी गेलेल्या सरकारला थोडीफार का होईना जाग आली. नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही किंवा हालचालही केलेली दिसत नाही असेही तटकरे म्हणाले.

१६ जानेवारीपासून पुन्हा हल्लाबोल
– दरम्यान राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ जानेवारीपासून सुरु केला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. रोजगार निर्मिती झाली नाही, राज्यात विकास घडत नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाडयापासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जानेवारीपासून मराठवाडयात आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मराठवाडयाच्या आठही जिल्हयामध्ये हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामध्ये पक्षाचे सर्व नेते सहभागी होणार आहेत. ३१ जानेवारीला औरंगाबादमध्ये हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार असून या सभेला शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती तटकरे यांनी दिली.