पवार आणि राष्ट्रपतीपद

0

राष्ट्रपतीपदाची निवडणूक सध्या पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे. त्याचे कारण म्हणजे या पदासाठी पवारांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संभाव्य दावेदारांमध्ये मोदी सरकारमधील एका मंत्र्याच्या नावाचीही मोठी चर्चा सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यात सोमवारी नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रपतीच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली. भाजप केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना निवडणुकीत उतरवू शकते, अशी चर्चा आहे. गेहलोत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायची इच्छा असेल, तर त्यांनी एनडीएमध्ये यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच केले. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात सोमवारी त्यांनी हे विधान केले आहे. मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आपल्याला आनंदच होईल. मात्र, संख्याबळ पाहता विरोधी पक्षांचा उमेदवार राष्ट्रपती होईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे शरद पवारांनी एनडीएमध्ये यावे, असे आठवले म्हणाले. मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनाही पवारांच्या बाजूने आपला कौल देईन यात शंका नाही. किंबहुना ते स्वतःही ती मते खेचून आणू शकतात. जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागायचा असेल तर त्यासंदर्भातील स्नेहभोजन आणि चर्चा फक्त ‘मातोश्री’वर होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होतेे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या स्नेहभोजनाच्या चर्चा रंगलेल्या असताना राऊत यांनी असे वक्तव्य केले होते. मात्र, नंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. शिवसेनेेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठनेते मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. परंतु, शिवसेना या निवडणुकीसाठी आता भाजप बरोबर राहणार आहे. एनडीएला अजूनही मते कमी असल्याने शिवसेनेचा भाव टिकून आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. लोकसभेतले 543 आणि राज्य सभेतले 233, असे एकूण 776 खासदार यासाठी मतदान करतात. प्रत्येक खासदाराच्या एका मताची किंमत ही 708 आहे (देशातल्या सर्व आमदारांच्या मतांची एकत्र किंमत भागीले 776, असे करून हा आकडा काढला जातो), देशातल्या एकूण आमदारांची संख्या 4,120 म्हणजे 776 खासदार अधिक 4,120 आमदार म्हणजेच यासाठी एकूण 4,896 जणांचे निर्वाचक मंडळ आहे. आमदारांच्या एका मताची किंमत ही प्रत्येक राज्यात वेगवेगळी असते. उदा. महाराष्ट्रः- महाराष्ट्राची 1971 मधील लोकसंख्या 5,04,12,235, पाच कोटी 4 लाख भागिले 288 याचे उत्तर येते 1,75,042. एका आमदाराच्या मताची किंमत काढण्यासाठी या संख्येला एक हजारने भागा, उत्तर 175.042 येते. त्याची पूर्णांक संख्या म्हणून 175 ही महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची किंमत आहे. यात 1,971 हे लोकसंख्येसाठी आधारभूत वर्ष आहे. यूपीत एका आमदाराच्या मताची किंमत 208, तर गोव्यासारख्या छोट्या राज्यात ती 20 आहे. राष्ट्रपतींच्या निवडीसाठी एकूण मतांची किंमत 10,98,882 (यात 776 गुणिले 708 अधिक देशातल्या एकूण आमदारांच्या मताची किंमत 5,49,474) म्हणजेच बहुमतासाठी आकडा : 5,49,442 इतका आहे.

पाच राज्यांच्या निवडणुका होण्याआधी एनडीएकडे 4,74,336 मते होती. पाच राज्यांतल्या यशानंतर हा आकडा 5,29,398 झाला असला, तरी अजूनही 20,044 ने कमीच आहे. शिवाय हा आकडा शिवसेनेला ग्राह्य धरूनचा आहे. शिवसेनेकडे 21 खासदार गुणिले 708 म्हणजे 14,868 अधिक 63 आमदार गुणिले 175 म्हणजे 11,025 अशी एकूण साधारण 25 हजार मते आहेत. शिवसेना सोबत आली नाही, तर एनडीएला कमी पडणार्‍या मतांमध्ये 25 हजारांनी वाढ होऊन ती 45 हजारांवर पोहोचतात. ही तूट भरून काढण्यासाठी एनडीएला बीजेडी किंवा एआयडीएमके यांची मदत घ्यावी लागेल. शिवाय काही अपक्ष आमदार, खासदारही कामी येतील. बीजेडीकडे 19,116 इतकी खासदारांची मते तर 17,433 इतकी आमदारांची मते आहेत. दोन्हींची बेरीज केली, तर बीजेडी सोबत आल्यास 36 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकते. एआयडीएमके सोबत आल्यास, एआयडीएमकेकडे 35 हजार 400 इतकी खासदारांची मते 23,584 इतकी आमदारांची मते आहेत. दोन्हींची बेरीज केली तर एआयडीएमके सोबत आल्यास साधारण 58 हजार मतांची वाढ एनडीएला मिळू शकेल. परंतु, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करू शकतात का? हा प्रश्‍न आहे. त्यामुळे या खेळात पवार सहमतीचे उमेदवार म्हणून चांगला रोल निभावू शकतात, असा तज्ज्ञांचा होरा आहे.