बारामती । बारामती बसस्थानकाच्या शेजारी नगरपरिषदेच्या मालकीचे शरदचंद्र पवार उद्योगभवन आहे. या उद्योगभवनाच्या स्वच्छतेचे अक्षरश: तीन तेरा वाजलेेले आहेत. चार-चार दिवस स्वच्छताच केली जात नसल्याने याठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीत वीसच्यावर दुकाने असून डॉक्टरांचेही दवाखाने आहेत. नगरपालिका दरमहा भाडेही वसूल करते. मात्र, स्वच्छता हा नगरपालिकेचा भाग असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. येथील स्वच्छता करणार्या महिलांना एका नगरसेवकाच्या भागात पाहिले गेले. गेली चार महिने येथे स्वच्छता कधीतरीच होत आहे. या प्रकारास येथील व्यावसायिक अक्षरश: वैतागलेले आहेत. या व्यावसायिकांनी नगराध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या भेटी घेऊन अनेकदा तक्रारी मांडलेल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
या इमारतीस सुरक्षारक्षकाची गरज असताना व ही नगरपालिकेची जबाबदारी असताना नगरपालिका टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे या इमारतीसमोरील वाहतूकही व पार्कींगही विस्कळीत आहे. पश्चिमेकडील एका भागाचे पार्कींग बंद करण्यात आलेले आहे. ही इमारत अत्यंत मध्यवर्ती भागात असूनदेखील नगरपालिका पूर्णत: याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथील ड्रेनेजही खराब आहेत.