पुणे: दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियांवर टीका केली होती. मोदींच्या टीकेला आज पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी आत्मपरिक्षण करावे पवार कुटुंबियांची काळजी करु नये, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, विविध मुद्द्यांवरुन यावेळी अजित पवारांनी राज्य सरकारवरही टीका केली.
शेतकरी तरुणांचे अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत. ५ वर्षातील आश्वासनांची पु्र्तता अद्याप झालेली नाही. आघाडीच्या काळात लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं गेलं होतं. त्यावेळी मंदीच्या काळात जगातील अनेक राष्ट्रं उध्वस्त झाली पण भारत तग धरुन होता याचे श्रेय तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंगांना होते. आता पुन्हा युपीएचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात येईल असा काँग्रेसचा जाहिरनामाही यावेळी त्यांनी लोकांसमोर मांडला आहे असे अजित पवार म्हणाले.