पवार दिल्लीत सक्रीय; मोदींविरोधात तिसरा पर्याय!

0

काँग्रेसमध्ये अस्वस्थता: सोनियांकडूनही चर्चेचे निमंत्रण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घसरत चाललेली लोकप्रियता, काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना पक्षाची कमान हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात स्वतःला प्रस्थापित करण्यात लागत असलेला वेळ आणि 2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा मोदी सरकार मांडत असलेला डाव पाहाता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले आहेत. 1 फेब्रुवारीला पवारांच्या निवासस्थानी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली असून, या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी मोदींविरोधात बलाढ्य पर्याय उभा करण्याची रणनीती आखली जाणार आहे. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सरकारला घेरण्यासाठीही व्यूहरचना आखली जाणार असल्याचे पवारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. पवारांच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पवारांसह प्रमुख नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मोदींच्याविरोधात पवारांनी राजकीय मोर्चा तयार करण्याच्या हालचाली चालविल्यामुळे राहुल गांधी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंग होणार असल्याचेही वरिष्ठ राजकीयतज्ज्ञांनी सांगितले आहे.

पवारांच्या हालचालीबाबत काँग्रेसमध्ये अस्वस्थता!
शरद पवार यांची पंतप्रधानपदाची महत्वांकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही. 2019ला लोकसभा व विधानसभा निवडणुका घेण्याबाबत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस व भाजप यांच्यापासून समान अंतर ठेवून तिसरा पर्याय निर्माण केला तर 2019 मध्ये भाजप किंवा काँग्रेसेतर पंतप्रधान देशाला मिळू शकतो. ही शक्यता गृहीत धरून पवारांनी देशातील सर्वच प्रमुख विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. वाद टाळण्यासाठी त्यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. तथापि, पवारांच्या या हालचालीबाबत काँग्रेसमधील ज्येष्ठांचा एक गट मात्र कमालीचा साशंक आहे. निवडणूक रणनीती आखण्यासाठी पवारांच्या नवी दिल्लीस्थित निवासस्थानी 1 फेब्रुवारीरोजी प्रमुख नेत्यांची बैठकही बोलावण्यात आलेली आहे. सर्व विरोधक एकत्र आले तर मोदींचा विजयरथ रोखता येईल, अशी पवारांनी मानसिकता आहे. यापूर्वी भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा व खा. शत्रुघ्न सिन्हा यांनीही विरोधी पक्षांना सोबत घेऊन राजकीय राष्ट्रीय मंच स्थापन केला आहे. तथापि, काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असून, तिसरा मोर्चा स्थापन करण्याऐवजी संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)मध्येच इतर राजकीय पक्षांनी यावे, असा सोनिया गांधींचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी पवारांसह प्रमुख नेत्यांना चर्चेचे निमंत्रण दिले असून, पुढील आठवड्यात ही बैठक पार पडण्याची शक्यता आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वात लढणे नको!
आगामी निवडणूक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढण्यास युपीएमधील घटक पक्षांनी नकार दिलेला आहे. तसेच, काँग्रेसमधील वरिष्ठ गटदेखील असा धोका पत्कारण्यास तयार नाहीत. त्यामुळे युपीएचे नेतृत्व खुद्द सोनिया गांधी यांनी करावे, किंवा शरद पवार यांच्याकडे हे नेतृत्व द्यावे, असा राजधानी दिल्लीत सूर निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत. राहुल यांना पंतप्रधान न करता त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाताखाली केंद्रीय मंत्रिपद सांभाळावे व अनुभव घ्यावा, असा सल्ला पवारांनी यापूर्वीच दिलेला आहे. भाजपपासून दूर झालेल्या शिवसेनेलाही युपीएमध्ये घेण्यासाठी पवारांचा आग्रह असून, त्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यावा, असा सल्ला पवारांनी काँग्रेस नेतृत्वाला दिला असल्याची माहितीही वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. त्यामुळे या नव्या समीकरणाचे राज्यात व्यापक परिणाम होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता, पवारांनी मुलायमसिंह यादव, सीताराम येचुरी, डी. राजा, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, चंद्रबाबू नायडू, चंद्रशेखर राव यांच्याशीही चर्चा चालवली असून, 2019च्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण निश्‍चितपणे निर्माण करण्यात पवार यशस्वी होतील, असेही सूत्र म्हणाले.