पवार हे ‘पवार’ आहेत

भाजपाला सत्ता गेल्याचे वास्तव स्वीकारता आलेले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेसोबतच्या ताणाताणीतून हातात आलेली सत्ता गमवावी लागल्याचे शल्य भाजपामध्ये असेलच. आघाडी सरकारला पायउतार करण्याचे बरेच प्रयत्न भाजपाच्या गोटातून झाले. परंतु, दरवेळी ते ‘फुसके बॉम्ब’ ठरले. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा एकास एक उमेदवार देण्याच्या मनस्थितीत असला तरी ही रणनिती किती यशस्वी होईल ? कारण, समोर शरद पवार आहेत. हे तेच पवार आहेत की, ज्यांनी अजित पवारांना पुढे करून भाजपाला तोंडघशी पाडले आणि शिवसेनेला राष्ट्रवादीकडे येण्यास भाग पाडले. नागपूरात भाजपाला टोलावताना त्यांनी केंद्र सरकारला निशाणा केले पण भाजपाचे महाराष्ट्रातील विकासपुरुष नितीन गडकरी यांच्या कामाचे, स्वभावाचे आवर्जून कौतुक केले. पवारांचे काँग्रेसशी सख्य नाही, भाजपाला दूर ठेवायचे म्हणून ते एकत्र आहेत. भविष्यात गडकरी जर महाराष्ट्रात परतले तर हेच शरद पवार भाजपाविरोधाच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहतील याची हमी कोणीच देऊ शकत नाही. कारण, पवार हे ‘पवार’ आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे याचा थांग कोणालाच लागत नाही.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी ऑक्टोबर 2019 च्या भर पावसात झालेली शरद पवारांची सभा आजही बर्‍याच जणांना आठवत असेल. खरं तर ती अभूतपूर्व जनसभा सहजासहजी विसरता येणे तसे शक्यच नाही. कारण, सत्ताधारी असो वा विरोधक; दोघांसाठी ही सभा त्यावेळी गेमचेंजर ठरली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातून पवार संपले, अशी हूल विरोधकांनी उठवली होती, त्याला पवारांनी भर पावसात उभे राहून याच सभेतून उत्तर दिले होते. त्यावेळचे शरद पवार वेगळेच भासले. त्याचीच पुनरावृत्ती कालच्या दिवशी ‘परिवारा’चे मुख्यालय असलेल्या विदर्भातील नागपूर शहरात झाली. पवारांच्या रोखठोक वक्तव्यांमधून, त्यांनी झाडलेल्या शब्दफैरीतून आणि विरोधकांना दिलेल्या आव्हानातून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटणार असल्याची नांदी झाली आहे. अनिल देशमुख प्रकरणापासून काहीसे बॅकफूटवर गेलेल्या शरद पवारांनी याच देशमुखांच्या गावात आल्यावर एखाद्या कसलेल्या पहिलवानासारखे भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. देशमुखांना जेलमध्ये टाकले, त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा देत पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा त्यांनी स्पष्ट केली. गेल्या अनेक वर्षांमध्ये नागपूरमध्ये आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख इथे नाहीत. हे आतापर्यंत घडले नव्हते. ही व्यथा व्यक्त करत त्यांनी जुन्या सहकार्‍याच्या पाठिशी उभे राहू हेही अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे. पवार वयाने ज्येष्ठ झाले असले, तरी येत्या निवडणुकीत तरुण योद्ध्याप्रमाणे ते पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पुन्हा एक प्रयत्न नक्कीच करतील. ते भाजपाला शिंगावर घेण्याच्या मनःस्थितीत दिसत आहेत. देशमुख व वाझे प्रकरण, अजित पवारांच्या बहिणी व मुलाकडील आयकर विभागाच्या धाडी, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडी व आयकर विभागाच्या माध्यमातून केले जात असलेले लक्ष्य आणि यातून राष्ट्रवादीमध्ये तयार झालेली अस्वस्थता पवारांनी नागपूरमध्ये बाहेर काढली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपा महाराष्ट्र प्रदेशची मुंबईत बैठक झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीतून महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. या सरकारमधील वेगवेगळे घोटाळे, कारनामे, अनाचार यांचा संदर्भ देत आता रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असे सांगत शड्डू ठोकण्याची भाषा केली. जनतेच्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर या सरकारमधील जो काही भ्रष्टाचार पाहायला मिळतोय त्यावरुन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल, या सरकारचे कितीही कपडे काढले तरी या निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असे नाही, अशी संभावनाही करून टाकली. शरद पवार हे सत्ताधारी गटाचे तर देवेंद्र फडणवीस हे विरोधकांचे नेतृत्त्व करणारे आहेत. या दोघांच्या गटातील अस्वस्थता वेगवेगळी आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. पण त्यांना अजूनही स्थिर होता आलेले नाही. गेली दोन वर्षे कोरोेना होता, त्यात भाजपाने केंद्राच्या सहाय्याने आघाडीविरोधात मोठी ‘आघाडी’ उघडलेली आहे. त्यामुळे आघाडीचे, प्रामुख्याने राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते वैतागलेले आहेत. यातूून या दोन पक्षात भाजपाविषयी कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा त्रागा शरद पवारांच्या आताच्या भाषणातून दिसून आला आहे. हे फार काही चालणार नाही आणि आम्ही सहन देखील करणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी नागपूरमध्ये केला आहे. भाजपाला सत्ता गेल्याचे वास्तव स्वीकारता आलेले नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेसोबतच्या ताणाताणीतून हातात आलेली सत्ता गमवावी लागल्याचे शल्य भाजपामध्ये असेलच. आघाडी सरकारला पायउतार करण्याचे बरेच प्रयत्न भाजपाच्या गोटातून झाले. परंतु, दरवेळी ते ‘फुसके बॉम्ब’ ठरले. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा एकास एक उमेदवार देण्याच्या मनस्थितीत असला तरी ही रणनिती किती यशस्वी होईल ? कारण, समोर शरद पवार आहेत. हे तेच पवार आहेत की, ज्यांनी अजित पवारांना पुढे करून भाजपाला तोंडघशी पाडले आणि शिवसेनेला राष्ट्रवादीकडे येण्यास भाग पाडले. नागपूरात भाजपाला टोलावताना त्यांनी केंद्र सरकारला निशाणा केले पण भाजपाचे महाराष्ट्रातील विकासपुरुष नितीन गडकरी यांच्या कामाचे, स्वभावाचे आवर्जून कौतुक केले. पवारांचे काँग्रेसशी सख्य नाही, भाजपाला दूर ठेवायचे म्हणून ते एकत्र आहेत. भविष्यात गडकरी जर महाराष्ट्रात परतले तर हेच शरद पवार भाजपाविरोधाच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहतील याची हमी कोणीच देऊ शकत नाही. कारण, पवार हे ‘पवार’ आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे याचा थांग कोणालाच लागत नाही.

अमित महाबळ , वृत्त संपादक