पवित्र रमजान महिन्याला पवित्र जुम्मा (शुक्रवार) पासून सुरूवात !

0

तब्बल 33 वर्षानंतर मे मध्ये आला रमजान महिना

यावल (काबीज शेख)- इस्लाम धर्मातील सर्वात ऊत्कृष्ट समजल्या जाणार्‍या पवित्र रमजान महिन्यास पवित्र जुम्मा (शुक्रवार) 18 मे पासून सुरूवात होण्याचा चांगला आणि विलक्षण योग आला आहे. विशेष म्हणजे तब्बल 33 वर्षानंतर मे महिन्यात पवित्र रमजान महिना आला आहे. त्यातही या महिन्यात पाच जुम्मे (शुक्रवार) पण येण्याचा योग आला आहे.

पाच मूलतत्वांपैकी एक रोजे
या महिन्याच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव सज्ज झाले आहेत. समाजबांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अनेक वैशिष्ट्यांनी परीपुर्ण असलेला हा महिना असून या संपूर्ण महिन्याचे रोजे (उपवास) फर्ज (अनिवार्य) आहे आणि म्हणून मुस्लिम बांधव या महिन्याचे रोजे (उपवास) करतात. इस्लाम धर्मातील पाच मुलतत्वांपैकी एक तत्व म्हणजे या महिन्याचे रोजे.कडक उपवार (रोजा) म्हणजे फक्त भुकेले तान्हेले राहने नव्हे तर शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या उपवास करणे गरजेचे आहे. प्रत्येक अवयवाचा उपवास म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयवांना सर्व प्रकारच्या अपप्रवृत्तींपासून दुर ठेवणे होय. याशिवाय रोजा ठेऊन भक्ती ( इबादद) कुराण पठण, नमाज पठण व सत्कर्म करणे.

तब्बल 33 वर्षानंतर मे मध्ये आला रमजान
यावर्षी रमजान महिना 33 वर्षानंतर कडक उन्हात मे महिन्यात आला आहे. यापूर्वी 1985 मध्ये मंगळवार, 21 मे पासून रमजान महिन्यास सुरूवात झाली होती तर 1986 मध्ये 10 मे शनिवार पासून रमजान महिन्यास सुरूवात झाली होती तर 1987 मध्ये 30 एप्रिल गुरूवारपासून रमजान महिन्यास सुरूवात झाली होती आणि आता 2018 यावर्षी 18 मे शुक्रवारपासून या महिन्यास
सुरूवात होत आहे.

वर्ष 2018 मध्ये ‘18’ या अंकाला महत्व 
यावर्षी 2018 मध्ये अनेक योग आले आहेत. त्यात 18 या अंकाला फार महत्त्व लाभले आहे. 18 मार्च 2018 ला गुढी पाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरूवात झाली. 18 एप्रिल 2018 रोजी साडेतीन मुहूर्तापैकी अक्षयतृतीया हा सण उत्सव साजरा करण्यात आला. 18 मे 2018 पासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली तर 18 ऑक्टोबर 2018 रोजी विजयादशमी (दसरा ) हा सण साजरा होणार आहे. अशा प्रकारे 2018 मध्ये 18 या अंकाला महत्व प्राप्त झाले आहे.

रमजान महिन्यात पाच शुक्रवार येण्याचा योग
इस्लाम धर्मातील मुस्लिम समाज बांधवांचा जुम्मा (शुक्रवार) या दिवसाला सर्वोत्तम मानले जाते. या दिवसाला फार महत्व आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सामूहिक नमाज अदा करतात त्यातही रमजान महिन्यातील शुक्रवारला मोठे महत्त्व प्राप्त आहे आणि यावर्षी रमजान महिन्यात पाच शुक्रवार येत असल्याने त्याचा मोठा लाभ मुस्लिम बांधव यांना मिळणार आहे.