पिंपरी-चिंचवड : पशुपती फायनान्स या कंपनीने शहरातील आणखी एका तरुणाला कर्ज देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन पद्धतीने 63 हजारांना गंडा घातल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या पूर्वी डांगे चौक येथील एका तरुणाला याच फायनान्स कंपनीने सुमारे दीड लाखांना गंडा घातला होता. अल्पेश नलवडे (वय 28, रा. आकुर्डी) याने याबाबत निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तीन अज्ञात इसमांनी मोबाईलवर एसएमएस करून अल्पेशची फसवणूक केली आहे. आरोपींमध्ये महिलांचाही समावेश आहे. 21 ते 29 ऑगस्ट दरम्यान त्याला चार लाखांचे कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून वारंवार बँक खात्यात पैसे भरायला लाऊन 63 हजारांची फसवणूक केली आहे.
यापूर्वीही एकास गंडवले
अशीच घटना डांगे चौक येथील अस्लम मुलाणी (वय 23) या तरुणासोबत घडली. या तरुणालाही 21 ते 29 ऑगस्टच्याच कालावधीत फसविण्यात आले होते. पशुपती फायनान्स आणि लिजिंग कंपनी यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने चार लाख रुपये कर्जाची मागणी केली. मात्र कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने मुलाणी याला फोन व एसएमएस करून कार्डाची प्रोसेसिंग फी म्हणून बँकेच्या खात्यावर एक लाख 63 हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतरही कर्ज न देता त्याची फसवणूक केली. या दोन्ही प्रकारात संबंधित कंपनीने तरुणांची सुमारे दोन लाखांची फसवणूक केली आहे.