शहापूर । पशुसंवर्धन म्हटले की गुरांचा दवाखाना आणि फक्त गायी, म्हशी, कुत्रा, मांजर, शेळ्या, कोंबड्या, यांच्यावर औषधोपचार करणारी सरकारी चावडी अशीच पारंपारिक ओळख पुढे येत आहे. परंतू पशुवैद्यकीय दवाखान्यातून शेतकरी क्रांती होण्यासाठी शासनाचा एकही रुपया न घेता केवळ लोकसहभातून पहिल्या शेतकरी वाचनालयाची स्थापना शहापूर तालुक्यातील किन्हवली पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. दिलीप धानके यांनी केली आहे.
शेतकर्यांना माहितीसाठी विनामुल्य वाचनालय
वाचनालयाच्या स्थापनेची संकल्पना मांडताना पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी नांगराने शेतीची मशागत होते. पण मेंदूच्या मशागतीसाठी पुस्तकांची गरज असते याच हेतूने या भागातील शेतकरी, पदाधिकारी, युवक विद्यार्थी व महिला या सर्वांसाठी हे वाचनालय विनामूल्य खुले केले आहे. या वाचनालयासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी प्रेरणा दिली आहे. अनेकांनी पुस्तके दान केली आहेत.
पुस्तके दान करणार्यांची नावे फलकावर
शेतकरी वाचनालय उभे करण्यासाठी शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील धानके, वैशाली हळदणकर, शीतलताई मालुसरे, डॉ.सुनील भंडलकर, अरुण संगारे, निलेश विशे, केशव घनघाव यांनी योगदान दिले आहे. तसेच पुस्तक दान देणारे लोकांची नावे एका फलकावर रेखाटण्यात आली आहेत. तसेच आम्ही पुस्तकांचे दान स्विकारतो असे आवाहन फलकही लावले आहे.