यावल- तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवार, 29 रोजी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे येथे येत आहेत. दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयामध्ये सर्व विभागाची त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत खरीप हंगामातील दुष्काळासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. गेल्या खरीप हंगामामध्ये तालुक्यात अल्प स्वरूपात झालेल्या पावसामुळे खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्यांना घेणे शक्य झाले नाही तसेच आगामी रब्बी हंगामाची देखील हीच अवस्था असून रब्बीकरीता पाणी मिळणे कठीण झाले आहे. तालुक्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. परीणामी शेतकरीवर्ग हवालदील झाला असून तो मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तेव्हा या सर्व परीस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी तीन वाजता राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत. येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक ते घेणार आहेत. तालुक्यातील खरीप हंगामातील दुष्काळाच्या संदर्भातील संपुर्ण आढावा घेवून ते शासनाकडे सादर करणार आहेत. या बैठकीला शासनाच्या सर्व विभागाच्या प्रमुखांनी हजर रहावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.