पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या सभेत चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती

0

कोलकाता – पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोदींच्या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे सभेच्याठिकाणी गोंधळ उडाला. तर काहीवेळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मोदींनीही अर्ध्यातूनच आपले भाषण थांबविले. या चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थितीत अनेकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रॅलीला संबोधित करताना मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या जनतेचा एवढा पाठिंबा असल्याचे चित्र पाहिल्यामुळेच ममतादीदी हिंसेवर उतरल्या होत्या, हे मला आता समजले असा टोला मोदींनी लगावला.

आमच्याप्रति पश्चिम बंगालच्या जनतेत असलेल्या प्रेमाला घाबरून लोकशाहीच्या वाचवण्याचे नाटक करणारे निर्दोषांचा बळी घेण्याच्या मागे आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत गावाकडच्या परिस्थितीकडे लक्ष देण्यात आलेले नाही, हे देशाचे दुर्भाग्य आहे. पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत गावांमधील समस्या बिकट असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

मोदींची सभा सुरू झाल्यानंतर अनेकांनी पुढे येऊन सभा ऐकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी आहे त्या जागेवर बसूनच सभा ऐकण्याचे आवाहन केले.