पश्चिम रेल्वेने केला आरोग्य सेवेवर कोट्यवधीचा खर्च

0

मुंबई । पश्चिम रेल्वेने विविध स्थानकांवर सुरू केलेल्या आपत्कालीन वैद्यकीय कक्षांसाठी गेल्या वर्षभरात 2.22 कोटी रुपये इतका खर्च केला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून ही माहिती उघडकेली आहे. रेल्वे मार्गावर होणार्‍या अपघातातील जखमी प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्याच्या हेतूने रेल्वे स्टेशनवर वैद्यकीय केंद्रे सुरू केली आहेत. पश्चिम रेल्वेवर 2016 पासून ही केंद्रे सुरू झाली आहेत. त्यात चर्चगेट, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, वसई रोड, विरार आणि पालघर येथील केंद्रांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वेनेही रुपी क्लिनिक सुरू करावे अशी रेल्वे मंत्र्यांची सूचना
फेब्रुवारी 2016 मध्ये पश्चिम रेल्वेच्या 10 रेल्वेस्थानकांवर हे आणीबाणी आरोग्य कक्ष सुरू झाले. यामध्ये चर्चगेट, मुंबई सेंट्रल, बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, वसई रोड, विरार आणि पालघर येथे हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अनिल गलगली यांनी पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यासह मध्य रेल्वेच्या धर्तीवर पश्चिम रेल्वेनेही 1 रुपी क्लिनिक सुरू केले तर, पश्चिम रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांची बचत होईल, अशी सूचना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केली आहे.

वैद्यकीय सेवेवर वर्षाला 2.22 कोटी खर्च
आरटीआय कार्यकर्ते अनिलगलगली यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे आणीबाणी आरोग्य कक्षाबाबत विविध माहिती विचारली होती. तेव्हा फेब्रुवारी 2016 पासून ते जानेवारी 2017 या कालावधीत पश्चिम रेल्वेने 2 कोटी 21 लाख 71 हजार 145 रुपये खर्च केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे आरोग्य अधिकारी डॉ. जी. के. सिंह यांनी दिली. प्रिन्सिपल सिक्युरिटीज अँड एलाइड सर्व्हिसेस या कंपनीला 2 वर्षांचे कंत्राट दिले असून त्याचे लायसन्स शुल्क शून्य आहे. पश्चिम रेल्वेने 4,60,140 रुपये अनामत रक्कम आणि बीपीजी 30,08,358 रुपये घेतली आहे, अशी माहिती ही आरटीआय अंतर्गत समोर आली आहे.