मुंबई-दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनला मिल्क कंटेनर जोडण्याची परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र में दूध की आपूर्ति रोकने संबंधी आंदोलन के मद्देनज़र आम जनता की सुविधा के लिए पश्चिम रेलवे द्वारा 59440 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पैसेंजर से अगले कुछ दिनों में मुंबई के लिए 44000 लीटर क्षमता प्रत्येक के 12 मिल्क कंटेनर लाने की विशेष अनुमति दी गई है। pic.twitter.com/BNgqZTdDTV
— Western Railway (@WesternRly) July 17, 2018
मुंबईत दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदाबाद-मुंबई सेंट्रल या पॅसेंजर ट्रेनला ४४ हजार लीटर क्षमतेचे प्रत्येकी १२ मिल्क कंटेनर जोडण्यात येतील. पुढच्या काही दिवसांसाठी पश्चिम रेल्वेने ही परवानगी दिली आहे. मंगळवारी पुण्यात हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला.
कालही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच अमरावती येथे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दुधाचे टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतले होते. काही ठिकाणी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणे हा या आंदोलनामागे हेतू आहे. पण अद्यापपर्यंत तरी स्वाभिमानला त्यात यश आलेले दिसत नाही, कारण मंगळवारी मुंबईत कुठेही दूधाची टंचाई जाणवली नाही. . मुंबईत दुधाचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. मुंबईत दुधाच्या गाडया फोडण्याचे किंवा दूध ओतून देण्याचे प्रकार कुठे घडू नयेत यासाठी पोलिसांनी मुंबईच्या प्रवेशद्वारापासून ते दूध केंद्रापर्यंत प्रत्येक गाडीला संरक्षण दिले होते.
मुख्यमंत्र्यांनी मागणी फेटाळली
राज्यातील एकूण दूध उत्पादनापैकी फक्त ४० टक्केच दूध सहकारी संघामार्फत, तर ६० टक्के दूध हे खाजगी संघामार्फत संकलित होते. खाजगी दूध संघाकडे शेतकऱ्यांची कसलीच आकडेवारी नाही. त्यामुळे जर दुधासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले तर त्यातून नवे घोटाळे होतील. त्यामुळे दुधासाठी अनुदान देणे शक्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी फेटाळून लावली. खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन चुकीचे आहे. राज्य सरकारची चर्चेची द्वारे नेहमीच खुली असून शेट्टींसोबत चर्चेची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.