पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस कालपासून जिल्हयात सक्रीय झाल्याने दुबार पेरणीच्या संकटामुळे चिंताग्रस्त झालेला बळीराजा सुखावला आहे. खरिप हंगाम वाया जातो की, काय? अशी चिंता शेतकर्यांना वाटत होती. पाऊस लांबल्यामुळे भितीचे ढग दाटून आले होते. मात्र जिल्ह्याच्या पश्चिमभागात पासाने दमदार हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणार्या धरणांमधील वाढ समाधानकारक असून पवना धरणात 54.70 तर खडकवासला धरणात 29.15 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्याच्या पुर्वभागात मात्र अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने तेथील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण कायम आहे.
धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, हवेली, भोर, वेल्हे, मावळ, मुळशीत चांगला पाऊस पडत असल्याने खरिपाला जीवदान मिळाले आहे. आंबेगावच्या पश्चिम भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून भात, ऊसासह इतर पिकांसाठी चांगला पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात भात लावणीसाठी शेतकरी लगबगीने कामाला लागला आहे. भोर-वेल्ह्यातही जोरदार पावासामुळे भातपिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी भातलावणीत मग्न झाला आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, चिल्हेवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वडज धरणातून मीना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तर चिल्हेवाडी धरणातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात आल्याने येडगाव धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पुर्वभाग अजूनही कोरडाच
जिल्ह्याच्या पुर्वभागात मात्र परेसा पाऊस अजूनही झालेला नाही. पुर्वभागात अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागात कमी पर्जन्य असल्याने पिके जाण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस नसल्याने पेरण्यादेखील खोळंबल्या आहेत. तर पिकांची खुरपणी कोळपणी करावी की नाही या चिंतेत शेतकरी वर्ग आहे. दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर तालुक्यात पिकांसाठ पावसाची नितांत गरज आहे. पिकांसाठी अजूनही पूरेसा पाऊस नसल्यामुळे जिल्ह्याचा पुर्वभागावरील दूबारपेरणीचे संकट अजूनही कायम आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋुत्य मौसमी पावसाची उत्तरसीमा स्थीर असून कोकण गोव्यात बहुतांश ठीकाणी तर मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या चार दिवसांत काही ठिकाणी मध्यम सरी पडण्याचा अदांज हवामान खात्याने वर्तविला आहे.
धरणांतील पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
खडकवासला – 29.15
चासकमान – 55.54
भामा आसखेड – 51.44
पानशेत- 52.26
पवना- 54.70
मुळशी – 42.21
टेमघर – 13.26
वरसगाव- 26.75
नीरा देवघर – 31.57
भाटघर – 29.26
माणिकडोह – 28.2
येडगाव- 33.33
वडज – 51.16
डिंभे – 38.35
कळमोडी- 100
वडिवळे – 58.87
आंद्रा- 87.13
कासारसाई- 71.42
गुंजवणी – 32.26
वीर – 18.14