नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि सत्ताधारी तृणमुल काँग्रेस यांच्यातील संघर्ष अगदी टोकाला गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. अजूनही संघर्ष संपलेला नाही. दरम्यान राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी भाजपा करण्याची शक्यता आहे. ’राज्यातील परिस्थिती नियंत्रणात नाही आहे. त्यामुळे भाजपा राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करु शकते. तसेच, भाजपाची वैचारिक भूमिका राष्ट्रपती शासन विरोधात आहे. मात्र, राज्यात सरकार चालवण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत असे भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितते आहे.
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता केसरीनाथ त्रिपाठी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला आहे.
आजपासून भाजपाच्यावतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणुनही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपाचे नेता राहुल सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’राज्य सरकारच्या मनमानी विरोधात सोमवारी बशीरहाटमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. तसेच भाजपा संपूर्ण राज्यात काळा दिवस पाळणार आहे.’