पिंपरी-चिंचवड : चारचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरु करण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच पंसती क्रमांकासाठी वाहनधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी केले आहे.
यासाठी २८ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात अर्ज करावे. अर्जासोबत पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकीत प्रत, तसेच डी. वाय. आर. टी. ओ पिंपरी-चिंचवड यांच्या नावे राष्ट्रीयकृत /शेड्युल्ड बॅंक पुणे येथील डी. डी. जोडावा. एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास २९ मे रोजी त्याची प्रत कार्यालयात लावण्यात येईल. या अर्जदारांना लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी दुपारी अडीचपर्यंत सिलबंद लिफाफ्यात सादर करावा लागेल. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शूल्क सरकार जमा होईल, असे प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.