पसायदान हे भारतीय संस्कृतीचे खरे गमक : बाळ महाराज

0

वसंत व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना

निगडी :- ज्ञानेश्‍वराचे पसायदान हे भारतीय संस्कृतीचे खरे गमक आहे. संतांचे हेच तत्त्वज्ञान माणसाला माणुसपण शिकविते. ज्ञानेश्‍वरांचे हे पसायदान छत्रपती शिवाजी महाराजांनी व पुढे क्रांतीकारकांनी आंमलात आणले, असे मत सद्गुरू बाळमहाराज यांनी व्यक्त केले.
वसंत व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘पसायदान ते वंदे मातरम’ या विषयावर ते बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, विश्‍व हिंदू परिषद पश्‍चिम महाराष्ट्रमंत्री विजय देशपांडे, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, पि.चि. शहर कार्याध्यक्ष नितिन वाटकर, नंदकुमार कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पसायदान तत्वज्ञान शिकविते
बाळ महाराज पुढे सांगितले की, देवगिरीतील भारतीय भगवा ध्वज खाली उतरल्यानंतर महाराष्ट्रात संत ज्ञानेश्‍वरांनी अठरापगड जातीच्या लोकांमध्ये सत्संगातून क्रांतीची बीजे रोवली. पंढरीच्या वाळवंटी त्यांनी भगवा ध्वज सर्वांच्या हातात दिला. ती परंपरा आजही वारकरी पुढे चालवत आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! यानुसार पुढे संत नामदेव, एकनाथ महाराजांचे कार्य तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज व संत रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी देव, देश व धर्मासाठी स्वराज्य निर्माण केले. ज्ञानेश्‍वरांचे पसायदान जगाला तत्वज्ञान शिकविते. या पसायदानाच्या प्रत्येक ओवीतून पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे क्रांतीकारक निर्माण झाले व वंदे मातरम् या जय घोषातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सूत्रसंचालन किरण वारके तर अपर्णा घोलप यांनी आभार मानले.