Attack on forest personnel of Yawal division while searching for Pasar accused यावल : तालुक्यातील डोंगरकठारा जवळील डोंगरदे वस्तीच्या पुढे असलेल्या पैझरीपाडा-काळाढोह येथे पसार आरोपींचा शोध घेण्यास गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. यात वनकर्मचारी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी यावल पोलिसात शासकीय कामात अडथळा, गैरकायद्याची मंडळी जमवत दहशत माजवणे सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा
डोंगरकठोरा, ता.यावलजवळ पैझरीपाडा-काळाडोह वस्ती आहे. या भागातील कैलास बारेला याला अनधिकृतपणे वृक्ष तोड करतांना वनविभागाने पकडले होते व त्याचे साथीदार पसार झाल्याने त्यांचा शोध घेण्याकरीता बुधवारी वनविभागाचे पथक जंगलात गेले होते. यात शासकीय वाहनाव्दारे वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक कृष्णा शेळके, रवींद्र तायडे, प्रकाश बारेला, गोवर्धन डोंगरे, जीवन नागरगोजे, सारंग आढाळे, महेश चव्हाण यांचे पथक पैझरी पाड्यावर पोहोचले त्या ठिकाणी असलेल्या एका छोट्याशा मंदिराच्या ओट्यावर काही संशयीत आरोपी झोपलेले दिसले तेव्हा त्यांना पकडले असता त्यांनी वनकर्मचार्यांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण करू लागले व आरडा-ओरड केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला-पुरुषांचा जमाव लाठ्याकाट्या घेऊन त्या ठिकाणी आला. त्यातील इना कमरा बारेला यांनी त्याच्या हातातील काठी घेऊन गोवर्धन डोंगरे यांच्या डोक्यात मारली तर रंगी रामसिंग पावरा यांनी कृष्णा शेळके यांना मारहाण केली या हाणामारीत कर्मचारी जखमी झाले तसेच या पथकावर जमावाने दगडफेक केली.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
स्वतःचा जीव वाचवून हे सर्वजण तेथून बाहेर निघाले व यावल पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगलीचा प्रयत्न करणे, गैर कायद्याचा जमाव एकत्रीत करणे व वन अधिकारी कर्मचार्यांना मारहाण करणे या कलमान्वये रंगी रामसिंग पावरा, सुरेश किसन पावरा, झामसिंग मखना बारेला, बिलरसिंग झामसिंग बारेला, प्यारसिंग झामसिंग बारेला, सखाराम झामसिंग बारेला, इना कमरा बारेला, सीमा सखाराम बारेला, रशीदा झामसिंग बारेला, मंजुराबाई सुरेश बारेला, सावळीबाई कमरू बारेला, व्यापारीबाई तुळशीराम बारेला या 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.