पसार आरोपी अखेर जाळ्यात

भुसावळ : कारसमोर दुचाकी लावल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना शहरातील खडका रोडवरील सिद्धेश्‍वर मंदिरासमोर 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. या प्रकरणी जनआधार पार्टीचे उपगटनेता शेख जाकीर शेख सरदार यांच्यासह चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पसार आरोपी शेख नाजीश शेख नासीर (19, सिद्धेश्‍वर मंदिराशेजारी, खडका रोड, भुसावळ) यास 23 रोजी बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

चौघांविरुद्ध दाखल होता गुन्हा
तक्रारदार अफुनिसा शेख अफजल (49, आझाद नगर, मणियार हॉलजवळ, सिद्धेश्‍वरमंदिराजवळ, खडका रोड) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी शेख नाजीश शेख नासीर याने त्याची चारचाकी तक्रारदार यांचा भाऊ शेख नईम याच्या दुचाकीजवळ लावली होती व याबाबत विचारणा केल्यानंतर उभयंतांमध्ये वाद उद्भवला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने आरोपींनी लाकडी दांड्याने तसेच लोखंडी रॉडने अफुनिसा व त्यांचा भाऊ शेख नईम यांना मारहाण करून दुखापत केली होती. या प्रकरणी आरोपी शेख नाजीश शेख नासीर, शेख दानिश उर्फ बबन शेख नासीर, शेख नासीर शेख सरदार व आरोपी तथा जनआधार पार्टीचे उप गटनेता शेख नाजीर शेख सरदार यांच्याविरुद्ध 16 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील पसार आरोपी शेख नाजीश शेख नासीरबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.