निगडी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात शुक्रवारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. ही मानवी साखळी कनेक्टिंग एनजीओ उपक्रमांतर्गत करण्यात आली. या मानवी साखळीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. निगडी हे पिंपरी-चिंचवड शहराचे शेवटचे टोक असून, येथील अनेक नागरिक कामकाज, शिक्षणासाठी पुणे शहरात जात असतात. त्यामुळे मेट्रो पिंपरीपर्यंतच न करता निगडीपर्यंत करावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
या संघटनांनी नोंदविला सहभाग
पोलीस नागरिक मित्र, ज्येष्ठ नागरिक संघ सिद्धिविनायक नगरी, संस्कार प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया, सावरकर मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पतंजली योग समिती, सुप्रभात मित्र परिवार ग्रुप दुर्गाटेकडी, नवयुग शैक्षणिक व साहित्य मंडळ निगडी प्राधिकरण, भावसार व्हिजन, निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरम, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड, घरकूल फेडरेशन, ग्राहक पंचायत, रोटरी क्लब ऑफ निगडी, लायन्स क्लब पुणे निगडी, रेडझोन संघर्ष समिती, जलदिंडी, सांगली जिल्हा मित्र मंडळ प्रतिष्ठान या संघटनांनी सहभाग नोंदविला.
हीच खरी वेळ!
मानवी साखळीत सहभाग झालेल्या प्रत्येकाने पुणे मेट्रो निगडीपासून सुरू व्हावी, या मागणीचे फलक हातात घेतले होते. कुठलीही निदर्शने अथवा घोषणाबाजी यावेळी झाली नाही. शांततेच्या मार्गाने ही मानवी साखळी करण्यात आली. पुणे मेट्रो पहिल्या फेजमध्ये निगडीपर्यंत पोहोचली तरच पिंपरी-चिंचवड शहराला पूर्णपणे न्याय मिळणार आहे. गर्दीचा आणि त्रासाचा प्रवास सुखकर करण्याची हीच खरी वेळ आहे, अशा प्रकारचे संदेश फलकाच्या माध्यमातून देण्यात आले.