भुसावळ : कोरोना संकटामुळे सलग दोन वर्षांपासून बंद असलेली जनरल (अनारक्षित) तिकीट सुविधा बुधवार, 29 जूनपासून सर्वत्र सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व मेल, एक्स्प्रेस, सुपरफास्ट रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांना जनरल तिकीट मिळणार असल्याने दोन वर्षांच्या काळानंतर सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मार्च 2020 मध्ये जनरल तिकीट सेवा बंद केली होती. त्यामुळे केवळ आरक्षित तिकीट असणार्या प्रवाशांनाच प्रवास करता येत होता.
रेल्वेच्या उत्पन्नात होणार मोठी वाढ
कोरोना काळात केवळ रीझर्व्ह (आरक्षीत) रेल्वे गाड्यात धावत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता त्यामुळे जनरल तिकीट सुविधा सुरू करण्याची वारंवार मागणी केली जात होती. अॅडव्हान्स रीझर्व्हेशन पीरियड (एआरपी) 120 दिवसांचा असल्याने जनरल तिकीट सुविधा सुरू केली जात नव्हती मात्र हा एआरपी कालावधी 28 जून रोजी संपल्याने प्रवाशांना आता तिकीट काउंटर, एटीव्हीएम (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन) आणि यूटीएस मोबाइल अॅपद्वारे जनरल तिकीट काढता येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून जनरल व इतर सुविधा या बंद होत्या. मात्र, या सेवा सुरू होणार असल्याने सामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेल्वेचे उत्पन्नदेखील यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
भरारी पथकाची प्रवाशांवर करडी जनरल
सर्वसाधारण तिकीट सुविधा प्रवाशांसाठी बुधवारपासून मिळणार असल्याने मोठ्या संख्येने प्रवाशांची भुसावळसह अन्य स्थानकांवर गर्दी वाढणार आहे. या अनुषंगाने फुकट्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरता भरारी पथकांकडून अचानक रेल्वे गाड्यांची तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे प्रवाशांनी योग्य ते तिकीट काढूनच प्रवास करावा व कटू कारवाई टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.