पहिल्याच दिवशी सव्वा कोटींची थकबाकी वसूल!

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील मिळकतधारकांकडे थकीत असलेल्या मिळकतकराच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने आता कारवाईचे हत्यार उपसले आहे. करवसुलीसाठी वेळोवेळी आवाहन करुनही मिळकतधारकांनी थकीत कराचा भरणा न केल्याने प्रशासनाने विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीत बुधवारी पहिल्याच दिवशी 1 कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी मिळकतदारांकडून वसूल करण्यात आली. ही कारवाई करसंकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सांगवीतील जवळकरनगर येथील मोर मॉल आणि ताथवडे येथील 7 गोदामांवर बुधवारी गावडे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. यामध्ये मोर मॉल यांच्याकडून 99 लाख आणि 7 गोदाम मालकांकडून 40 लाख 65 हजार रुपयांची मिळकतकर थकबाकी वसूल करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
करसंकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप खोत, प्रशासन अधिकारी विठ्ठल भोसले, जयश्री साने, सहायक मंडळाधिकारी, अजित नखाते, संजय लांडगे, पुरुषोत्तम ढोरे, सिद्धार्थ जगताप, संदीप सोनवणे, प्रकाश सदाफुले, दिनकर खर्चे आदी कर्मचार्‍यांनी मिळकत जप्तीची कारवाई केली.

65 हजार थकबाकीधारकांना नोटिसा
करसंकलन विभागामार्फत 7 मार्च 2017 अखेर ज्या मिळकतधारांकडे 10÷ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे; अशा सुमारे 65 हजार जणांना नोटिसा बजविण्यात आल्या असून, आजअखेर 24 हजार 345 मिळकतधारकांना जप्तीपूर्वीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. करसंकलन विभागाच्या वतीने बुधवारपासून जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्याच्याकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे; त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. तरी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मिळकतधारकांनी मिळकत कराचा भरणा करावा, असे आवाहन दिलीप गावडे यांनी केले आहे.

करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू
आजअखेर करसंकलन विभागाकडे 4 लाख 49 हजार 812 मिळकतींची नोंद असून, त्यापैकी 3 लाख 3 हजार 592 मिळकतधारकांनी 366.70 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी 31 मार्चपर्यंत सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. मिळकत कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरता येतील. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन मिळकतकर भरण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.