पहिल्याच दिवशी 1 लाख 72 हजार वृक्षांची लागवड

0

जळगाव । पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज झाली असून ही गरज ओळखून नागरीकांनी मोठया संख्येने वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत आज जिल्हयातील वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वलाताई पाटील, विधान परिषद सदस्या स्मीताताई वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत रामदेववाडी येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, रामदेववाडीचे सरपंच संतोष राठोड, शिरसोली येथील बारी विद्यालयाचे हरित सेनेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

मनपातर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण
महानगर पालिकेतर्फे वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन वार्ड क्र. 12 आव्हाणे, निमखेडी शिवरातील संत सावता नगर मध्ये वसंत पाटील यांच्या घराजवळ वृक्ष लागवड करून करण्यात आले. याप्रसंगी महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता सुनील भोळे, नगरसेवक संदेश भोईटे, सुनील माळी, आबा कापसे, दुर्गेश पाटील, नगरसेविका दिपाली दुर्गेश पाटील, ज्योती इंगळे, शितल चौधरी, प्रतिभा कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फेत वार्ड क्र. 11, 12 व 13 येथे घेण्यात आला. यशस्वीतेसाठी शाखा अभियंता प्रकाश पाटील, वसंत पाटील, बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

वनविभागाच्या क्षेत्रावर 27 हजार 500 वृक्ष 1 ते 7 जुलै दरम्यान जिल्ह्यात वृक्ष लागवडीची मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जळगाव जिल्हयाला 20.89 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात 23 लाख 66 हजार खड्डे तयार आहेत. या कालावधीत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व नागरीकांनी या मोहिमेत मोठया संख्येने सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन ही मोहिम यशस्वी करावी. त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले घर, शाळा परिसरात प्रत्येकी पाच झाडे लावावीत, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. यावेळी रामदेववाडी येथील वनविभागाच्या क्षेत्रावर 27 हजार 500 वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एन. जे. पाटील यांनी दिली. वृक्ष लागवड मोहिमेत शिरसोली येथील बारी विद्यालयाचे हरित सेनेचे विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी झाडे लावा, प्रदूषण टाळा, झाडे लावा, झाडे वाचवा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.

महावितरणतर्फे वृक्षारोपण
महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे राज्यात चार कोटी वृक्षलागवड अभियानाअंतर्गत परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात विद्युत भवन, जुनी औद्योगिक वसाहत येथे वृक्षारोपण करण्यात आले. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी ते म्हणाले, वृक्षारोपणासह संगोपनाची जबाबदारी महत्वाची आहे. पर्यावरण रक्षणार्थ आपल्या घर व परिसरातही वृक्ष लावून हरित सैनिक व्हावे, असे आवाहन त्यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना केले. वृक्षारोपण उपक्रमात अधिक्षक अभियंता दत्तात्रय बनासोडे, कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड, कार्यकारी अभियंता नरेंद्र नारायणे, कार्यकारी अभियंता विजेंद्र मुळे,वरिष्ठ व्यवस्थापक अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर वरिष्ठ व्यवस्थापक रामचंद्र वैदकर, जनसंपर्क अधिकारी श्री.किशोर खोबरे आदीसह अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

ठिकठिकाणी वृक्ष लागवड
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास आज संपूर्ण जिल्हयात ठिकठिकाणी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या कार्यक्रमातंर्गत जिल्हयात 1 लाख 72 हजार 251 वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी दिली. वनविभागामार्फत जिल्हयातील वृक्ष लागवडीची माहिती दिवसातून तीन वेळा जमा करण्यात येत असून यासाठी वन विभागाने स्वतंत्र संगणक यंत्रणा कार्यरत केली आहे. या यंत्रणेमार्फत संपूर्ण जिल्हयातील वृक्ष लागवडीची माहिती सकाळी दहा, दुपारी दोन व सांयकाळी सहा वाजता घेऊन ती मंत्रालयास कळविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही मोहिम जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्रभावीपणे व नियोजनबध्दरित्या राबविण्यात येत असल्याने पहिल्याच दिवशी सांयकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हयात 1 लाख 72 हजार 251 वृक्ष लागवड झाल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली. तसेच मोहिमेस विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.