एरंडोल। शहराबाहेर असलेल्या नविन वसाहतींमधील रस्त्यांची पहिल्याच पावसात अत्यंत दयनिय अवस्था झाली असून स्थानिक नगरसेवकांनी मागणी करून देखील नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. शहराबाहेर असलेल्या सर्व नविन वसाहतींमध्ये रस्ते, सांडपाणी, मोकाट कुत्रे व डुकरे आणि स्वच्छता आदी समस्या निर्माण झाल्या असून रहिवासी त्रस्त झाले आहेत. शहराबाहेर सुमारे तीस ते पस्तीस नविन वसाहती आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंब नविन वसाहतींमध्ये राहत आहेत. मात्र सर्व वसाहतींमध्ये जाणार्या रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून पहिल्याच पावसात रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे सर्वत्र चिखल निर्माण झाला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होते तारेवरची कसरत
चिखलामुळे रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्कील होत आहे. तसेच ठिकठीकाणी कचर्याचे ढीग जमा झाले असून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांडपाणी वाहण्यासाठी गटारी नसल्यामुळे सर्व सांडपाणी परिसरातच तुंबत असते. सर्वत्र असलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे देखील पालिकेने प्रयत्न केले नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे रहिवाशांना आपल्या घरात प्रवेश करतांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. विशेष म्हणजे पालिकेच्या मुख्याधिकारी राहत असलेल्या गांधीपुर्यात तर अस्वच्छतेने कळसच गाठला आहे. मुख्याधिकार्यांच्या निवासस्थानाजवळच काचर्याचे ढीग जमा झाले आहेत. सर्व नविन वसाहतींमधील रस्ते कच्चे असल्यामुळे अनेक जण दररोज पाय घसरून पडत असतात. लाखो रुपये खर्च करून घरांचे बांधकाम केले. मात्र वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे घरात राहण्याचे मानसिक समाधान मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
रस्त्याअभावी होतात हाल
काही नविन वसाहतींना रस्तेच नसल्याने नागरिकांचे खुप हाल होत आहेत. घरातील लहान थोर लोक आजारी पडले तर त्यांना रस्त्यांअभावी लवकर दवाखान्यात नेण्यासाठीही खुप कसरत करावी लागत आहे. स्थानिक नगरसेवकांनी पालिकेकडे तक्रार करून देखील पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आचर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरीत दखल देवून नविन वसाहतींमध्ये असलेल्या रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजून नागरिकाना दिलासा द्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.