पहिल्याच पावसात बंधार्‍याला पडले भगदाड

0

बोदवड । जलचक्र बु. येथील शांताराम धोबी व तेजराव बाबुराव पाटील यांच्या शेताजवळील सिमेंट नालाबांधाला पहिल्या पावसात भगदड पडले असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. सिमेंट बंधार्‍याच्या उजव्या बाजुकडील वॉल, कि ला मोठे भगदड पडले आहे. सिमेंट बांधाचे कामात अंदाज पत्रकाप्रमाणे साहित्याचा वापर केला नाही, रेतीऐवजी स्टोन क्रशर मशिनवरील फफुटा वापरल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सिमेंट, रेती मध्ये मर्यादेपेक्षा खडीचा वापर केल्याचे दिसून येते, पहिल्याच पावसात जलयुक्त शिवार योजनेचे बारा वाजले असून शासनाची योजना झोलयुक्त शिवार ठरली आहे.

कामाचे दोन वेळा समवर्ती मुल्यमापन होणे गरजेचे
बोदवड तालुक्यात सिमेंट नाला बांधाची अनेक कामे सुरु असून या कामावर कुठेही प्रथम काम सुरु असतांना कामाचा फलक, योजनेचे नाव, अंदाजपत्रक, गट क्रमांक व ठेकेदाराचे, मक्तेदाराचे नावाचा फलक कुठेही लावलेला दिसून येत नाही. काम घेणारा ठेकेदार काम करीत नसून दुसराच कोणी काम करतो. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामाचे दोन वेळा समवर्ती मुल्यमापन होणे गरजेचे आहे. काम सुरु असतांना गुणवत्ता नियंत्रक निरीक्षकामार्फत मुल्यमापन होते. काम पूर्ण झाल्यावर त्रयस्थ संस्थेमार्फत मुल्यमापन करण्याअगोदर बंधार्‍याचे कामाचे बारा वाजले आहे.

लाखोंचे नुकसान
या बंधार्‍याचे काम अधिकृत ठेकेदाराने न करता दुय्यम ठेकेदाराने केले आहे. बोदवड तालुक्यात हा प्रकार सर्रास सुरु आहे. शासनाचे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाले असून योजनेचा हेतू सफल झाला नसून जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त शिवार ठरण्यास पात्र ठरली असून संबंधित मक्तेदाराची पाठराखण करणार की काळ्या यादीत टाकणार, संबंधित अधिकारी काय कार्यवाही करतात, काय चौकशी करतात, त्रयस्थ संख्या काय, मुल्यमापन करणार याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

दौर्‍यांवर प्रश्‍नचिन्ह
तालुक्यातील रस्ते, घरकुल, तलावातील, नाला खोलीकरण, सिमेंट बांध बांधणे या कामांची गटविकास अधिकारी व पंचायत समितीचे सभापती सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत विकासकामांची दौरे करुन पाहणी करतात का? खरोखर विकासकामांना भेटी देवून कामाची गुणवत्ता तपासतात का? कि दुसरीकडे भलताच दौरा करुन शासनाचे पैसे वाया घालवत आहे. खरोखर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाच्या साहित्य चाचणी अहवालाप्रमाणे काम केले असते तर बंधार्‍याचे बारा वाजले नसते.

बांधकामात करण्यात आला दगड गोट्यांचा वापर
कामाची अंमलबजावणी पारदर्शकपणे करतांना कामाची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी, कर्मचारी दिसून येत नाही. याचा फायदा ठेकेदार घेतो. कामात स्ट्रील कमी वापरणे, दगडगोटे, काँक्रिटमध्ये टाकणे, पमाणित खडीपेक्षा बोलर वापरणे, यामुळे कामाचा दर्जा व गुणवत्ता टिकून राहत नाही. या सिमेंट बंधार्‍यात निकृष्ट दर्जाचे साहित्याचा वापर केला असून म्हणून हा बंधारा लिकेज झाला असून भगदड पडले आहे. स्थानिक नागरिकांचे सुध्दा म्हणणे आहे की काँक्रिटमध्ये रेतीऐवजी स्टोन मशिनवरील फफुटा वापरला आहे. यामुळे कामाचा दर्जा, गुणवत्ता, पारदर्शकतेचा बोजवारा उडला असून योजनेच्या नियम, अटीला ठेकेदाराने ठेंगा दाखविला आहे.