पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी केली मागणी
केंद्रीय मंत्री गडकरींना चिंचवड प्रवासी संघाचे निवेदन
चिंचवड- पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडी ते कात्रजपर्यंत व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने मागणीचे निवेदन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात देण्यात आले. चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी ही मागणी मान्य करावी, असे प्रवासी संघाच्यावतीने सांगितले. यावेळी निवेदन देताना चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संघाचे मुकेश चुडासमा, निर्मला माने, शरद चव्हाण, नंदु भोगले आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्व खासदार, राज्यसभा सदस्य, आमदार, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेचे आयुक्त यांना या निवेदनाची प्रत देण्यात येणार आहे.
तरूणांचा वाढता ओढा
प्रवासी संघाने दिलेल्या या निवेदनात अध्यक्ष भालदार यांनी सांगितले आहे की, पुणे महापालिकेची लोकसंख्या 38 लाख व पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या आसपास झाली आहे. औद्योगिकरणामुळे देशभरातील तरूणांचा ओढा दोन्ही शहरात वाढतो आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्प उपक्रमाकरीता निवड झाली आहे. रस्ते वाहतूकीकरिता निगडी येथून पी.एम.पी.एम.एल.ने दररोज 2 लाख 80 हजार प्रवासी पुणे शहरात सरकारी, निमसरकारी, कार्यालये, शाळा, कॉलेज, व्यवसायानिमित्त ये-जा करीत आहे. रस्ते मार्गाला समांतर असलेले पुणे-लोणावळा मार्गावर चार युनिट लोकल दिवसभरात 42 दुतर्फा धावत असून दररोज 1 लाख 30 प्रवासी लोकलने प्रवास करीत आहे. आकुर्डी ते पुणे 5 ते 6 रूपये तिकीट दर आहे. पी.एम.पी.एल. चे निगडी ते स्वारगेटपर्यंत 35 रूपये तिकीट दर आहे. या शहरात कष्टकरी, गरीब, अल्पउत्पन्न गटातील नागरीकांची लोकसंख्या अंदाजे 60 टक्क्याच्या आसपास आहे.
योग्य निर्णय घेतले नाहीत
कमहापालिकेच्या पी.एम.पी.एम.एल ने होणारी सेवा व रेल्वे मार्गावरील लोकल प्रवासी सेवा अत्यल्प व अपूरी असल्याने नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी केली. आज दोन्ही शहरात अंदाजे 44 लाखांहून अधिक सर्व प्रकारचे वाहने उपलब्ध आहेत. त्याचे प्रमुख कारण दोन्ही महापालिकेच्या राज्यकर्त्यांनी शहर विकासाचा नियोजनाकडे हव्या त्याप्रमाणात वेळो-वेळी योग्य निर्णय घेतले नाही. असे चित्र असतानाच सन 2006 साली केंद्र सरकार, राज्य शासन व दोन्ही महापालिकांनी संयुक्तपणे मेट्रो प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. मेट्रो प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करण्याचे काम दिली. मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डी.एम.आर.सी.) ने अभ्यास करून पिंपरी-चिंचवड महापालिकेत अहवाल सादर केला. 2012 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त श्रीकर परदेशी महापालिका सभेत माहिती दिली.
अन्य संघटनांची मागणी
मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या मेट्रो प्रकल्प अहवालात पिंपरी चिंचवड महापालिका ऐवजी निगडी हे पहिले स्टेशन देण्यासाठी तिथे तेवढी लोकसंख्या नाही. निगडी येथे सगळे प्रवासी मिळणार नाहीत. म्हणून पिंपरीपासून रुट स्वारगेटपर्यंतच घेतला आहे. चिंचवड प्रवासी संघाच्या मते दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने चूकीची माहिती दिली, म्हणून 05 डिसेंबर 1916 रोजी चिंचवड गाव येथील हुतात्मा चापेकर बंधू समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करून सह्याची मोहिम राबविण्यास सुरूवात केली. त्याची प्रत सर्वांना पाठविली आहे. चिंचवड प्रवासी संघाप्रमाणेच या शहरातील इतरही सामाजिक संघटनांनीही याची दखल घेवून निगडी येथून मेट्रो सुरू व्हावी, अशी मागणी केली आहे.