नवी दिल्ली। देशात आयकर भरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. देशात 15 जूनपर्यंत भरण्यात आलेल्या विविध करांच्या संकलनात सुमारे 26.2 टक्के वाढ झाली आहे. 15 जूनपर्यंत देशात गेल्यावर्षी 80,075 कोटी रुपये जमा झाले होते. यावर्षी या कालावधीत सुमारे 101,024 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आयकर भरण्याचे वाढलेले प्रमाण देशाची आर्थिक स्थिती चांगले असल्याचे संकेत आहेत असे या विषयातील जाणकारांचे मत आहे. कर संकलानात मुंबई आघाडीवर आहे. या यादीत दुसर्या क्रमांकावर राजधानी दिल्लीचा समावेश आहे. दिल्लीमध्ये या मुदतीत करभरण्याच्या प्रमाणात 38 टक्के वाढ झाली असून सुमारे 11, 582 कोटी रुपयांचा कर गोळा झाला आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 8334 कोटी रुपये इतके होते. कोलकात्यातील कर संकलनात 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोलकात्यात गेल्या वर्षी 3815 कोटी रुपये कर गोळा झाला होता. यावेळी करापोटी 4084 कोटी रुपये जमा झाले आहेत.
मुंबईतून सर्वात जास्त कर
आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील चार मेट्रो शहरांमध्ये सर्वात जास्त कर एकट्या मुंबई विभागातून गोळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत कर भरण्याचे प्रमाण 138 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्यावर्षी या अवधीत 9614 कोटी रुपयांचा कर भरणार्या मुंबईकरांनी यावेळी 22,884 कोटी रुपयांचा कर सरकारी तिजोरीत भरला आहे. देशात एकुण भरल्या जाणार्या करांमध्ये मुंबईकरांचे योगदान मोठे असते.