पुणे : राज्यात एकीकडे निवडणुकीचा फिवर सुरु असताना पुण्यात गहुंजे स्टेडियमवर होत असलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी सत्ता गाजविली. पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत कांगारुंची दाणादाण उडवली. उमेश यादवच्या यादवी प्रहारासोबत अश्विन आणि जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची अवस्था ९ बाद २५६ अशी झाली आहे. शेवटच्या षटकांत आलेल्या मिचेल स्टार्कच्या धुवाधार अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलिया संघ कसाबसा सावरला आहे. भारतीय संघाकडून उमेश यादवने यावेळी चार विकेट्स घेतल्या, तर अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. तर जयंत यादवने एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केलेल्या टीम इंडियाचे या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. ही लढत जिंकून विजयी मालिका कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर तब्बल एक तपानंतर विजयी पताका फडकवण्यासाठी कांगारू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
दुसऱ्या सत्रात अश्विन-जडेजा जोडीची कमाल
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाने चांगली केली होती. पहिल्या सत्रात फक्त एक विकेट पडली होती. डेव्हिड वॉर्नर(३८) याची विकेट उमेश यादवने घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात अश्विन-जडेजा जोडीने कमाल केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथला(२७) अश्विनने कोहलीकरवी झेलबाद केले. तर शॉन मार्श याला जयंत यादवने तंबूत पाठवले. हेंड्सकोम आणि मिचेल मार्श यांना रवींद्र जडेजाने गुंडाळले. रेनशॉ रिटायर्ड हर्ट म्हणून तंबूत दाखल झाला होता. पण दुसऱ्या सत्रात त्यालाही बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळ्याच्या प्रयत्नात खेळी केली. त्यात उमेश यादवला यश देखील आले. वेगवान गोलंदाजीच्या जोरावर उमेश याने दोन विकेट्स घेऊन कांगारुंना धक्का दिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज तंबूत दाखल झाले असून संघाची धावसंख्या २५६ इतकी आहे.
भारतीय फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा
भारताने सलग १९ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाची चव पाहिलेली नाही. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर २०१२-१३ च्या मालिकेत ४-० असा दणदणीत विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियन संघाला या पराभवाच्या आठवणी अजूनही ताज्या वाटत नसल्या तरीही घरचे मैदान, अनुकूल खेळपट्टी व वातावरण या सर्वच गोष्टी भारतासाठी वरचढ ठरणाऱ्या आहेत. त्यातच भारताने अलीकडे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-०, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४-० असा विजय मिळवला असून, नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना जिंकून जणू काही ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपल्या भावी यशाबाबत इशाराच दिला आहे. आता भारतीय फलंदाजीमध्ये कर्णधार विराट कोहली जबरदस्त कामगिरी करत आहे. लागोपाठ चार मालिकांमध्ये द्विशतक टोलवण्याची किमया त्याने साधली आहे. कोहलीबरोबरच मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मुख्य मदार आहे. अलीकडच्या काळात रविचंद्रन अश्विनने आपण गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही हुकमी एक्का आहोत, हे दाखवून दिले आहे.
मार्शची वनडे स्टाईल फलंदाजी
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर कांगारूंच्या संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडतानाही संघर्ष करावा लागला. शेवटच्या गड्यासाठी मिचेल स्टार्क आणि जॉश हेझलवूड यांनी 51 धावांची भागीदारी रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर एम. रेनशॉ आणि तळाचा खेळाडू मिचेल स्टार्क व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. शेवटी आलेल्या मिचेल मार्शने वनडे स्टाईल फलंदाजी करत संघाला २०० वरून २५० वर पोहोचविले आहे. तो अर्धशतक फटकावून 57 धावांवर खेळत आहे. तर रेनशॉने 68 धावांची खेळी केली. अश्विनने त्याला मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताकडून उमेश यादवने भेदक मारा करत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. जयंत यादवनेही एक गडी बाद केला.