पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांच्या वेळेत बदल

0

नवी दिल्ली । उत्तर भारतात सध्या सुरू असलेला हिवाळा आणि आगामी काही दिवसांतील हावामानातील बदलांच्या पार्श्‍वभूमीवर भारत व श्रीलंका संघांमध्ये पुढील महिन्यात होणार्‍या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे. धरमशाला व मोहाली येथे खेळविले जाणारे हे सामने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दुपारी 1-30 वाजता सुरू होणार होते.

परंतु या दोन्ही ठिकाणी सायंकाळनंतर पडणारे दंव आणि अतिशीत हवामान यामुळे सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा प्रस्ताव संयोजक हिमाचल प्रदेश आणि पंजाब क्रिकेट संघटनांकडून देण्यात आला होता. बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला असून हे दोन्ही सामने दुपारी 1-30 ऐवजी सकाळी 11.30 वाजता सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. धरमशाला येथील सामना 10 डिसेंबर रोजी, तर मोहालीतील सामना 13 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र विशाखापट्टणम येथे होणारा तिसरा एकदिवसीय सामना पूर्वनियोजित वेळेला, म्हणजेच दुपारी 1-30 वाजताच सुरू होणार असल्याचेही बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी काढलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.