शहादा । शहादा नगरपालिकेच्या 28 नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत आल्यावर पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा दि. 17 रोजी होणार असून या सभेत 238 विषयांना मंजुरीसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहे. 238 विषयांवर चर्चा करण्यासाठी सभागृहात किती वेळ व काळ लागेल, तसेच भाजपा सत्तेवर आल्यानंतर वर्षभरातले विकासकामे एकाच सभेत होणार आहे काय ? असा प्रश्न विरोधी नगरसेवकांना पडला आहे.
20 तासाचा कालावधी अपेक्षित
नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच सत्तेवर आल्यानंतर सर्वसाधारण सभा 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. सदर सभेत 238 विषयांना मंजुरीसाठी सभागृहात प्रस्तावित करण्यात येणार आहे. 238 विषयांची टिपण्णी नगरसेवकांना दि. 16 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे. 238 विषयांवर नगरसेवक अभ्यास करून चर्चा करणार तरी कसे ? सदर सभा ही मागील अंदाजपत्रकाला मंजुरीसाठी आयोजित करण्यात आली आहे. मागील अंदाजपत्रकाला मंजुरीसाठी सभा होत असतांना नियमानुसार अतिमहत्वाचे 10 ते 12 विषय सभेत घेता येऊ शकतात. मात्र या सभेत शहादा पालिकेच्या इतिहासात 238 विषयांना मंजुरीसाठी अजेंड्यावर घेण्यात आले आहे. एका विषयाला 5 मिनीटे जरी चर्चा केली तरी 238 विषयांना चर्चेसाठी सुमारे 20 तासाचा कालावधी अपेक्षित धरावा लागेल, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू आहे.
अनेक महत्वाचे विषय अजेंड्यावर
238 विषयांपैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रवेशद्वारापर्यंत रस्ता डांबरीकरणाबाबत तीनदा विषय घेण्यात आला आहे. मात्र सदर रस्ता हा निवडणुकीच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त रस्ता ठेकेदाराने केला असतांनाही पुन्हा हा विषयच अजेंड्यावर का? प्रभाग क्र.13 मध्ये सुमारे एकाच प्रभागातून 35 विषय घेण्यात आले आहेत. निखोरा रस्त्यावरील गोमाई नदीवर संरक्षण भींत बांधणेकामी एकाच विषयाला तीनदा विषयपत्रिकेवर घेण्यात आला आहे. ह्या विषयपत्रीकेत एकच विषय अनेकदा आल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नगरसेवकांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे 238 विषयांसाठी किती वेळ व काळ लागेल याबाब नगरसेवकांसह शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 238 विषय मंजुरीसाठी घेण्यापूर्वी नगराध्यक्षांनी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन विषय घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा त्याचा मानस असू शकतो.