कोलकाता । श्रीलंकेविरुद्ध येत्या 16 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्सला होणार असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आणि आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय संघाने जय्यत तयारीला प्रारंभ केला असून भारताचा प्रमुख भर हा आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करणे आणि फिरकीविरुद्ध रिव्हर्स स्वीपचे तंत्र वापरणे यावर राहिला आहे. भारतीय संघासोबत असलेल्या मदतनीसांनी अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांना आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. इडन गार्डनवर भारतीय संघाचे हे सरावाचे पहिले सत्र सोमवारी पार पडले.
अजिंक्यने या चेंडूंचा सर्वाधिक सामना केला. जवळपास अर्धा तास तो आखूड टप्प्याच्या चेंडूंवर खेळण्याचा सराव करत होता. प्रामुख्याने भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार असल्यामुळे त्याचीही तयारी भारतीय खेळाडूंनी सुरू केली आहे. दोन महिन्यांच्या दक्षिण आफ्रिका दौर्यात भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे व तीन टी-20 सामने खेळणार आहे.
अजिंक्य व रवी शास्त्री यांनी घेतला खेळपट्टीचा अंदाज
राहुल आणि धवन यांनी क्रमाक्रमाने फिरकी व वेगवान गोलंदाजीचा सामना केला. या दोन्ही डावखुर्या फलंदाजांनी रिव्हर्स स्विपवर मेहनत घेतली. रहाणेने कुलदीप यादव आणि अश्विन यांच्या गोलंदाजीवर सराव करून श्रीलंकेच्या रंगना हेरथ व लक्षण संदाकन यांच्या फिरकीला कसे सामोरे जाता येईल, याची तयारी केली. विराटने जवळपास दोन-अडीच तास चाललेल्या या सराव सत्रात भरपूर मेहनत घेतली. प्रारंभी अनेक व्यायामप्रकार करून त्याने आपल्या या सरावाला सुरुवात केली. विराटनेही नेटमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध रिव्हर्स स्विपचा अवलंब करून पाहिला. सौराष्ट्रचे चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांनी मात्र सराव सत्रात भाग घेतला नाही. त्यांनी विश्रांती घेणे पसंत केले. रोहित शर्माने याच इडन गार्डनवर 264 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याने खेळपट्टीची पाहणी केली तसेच अजिंक्य व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही वैयक्तिकरित्या खेळपट्टीचा अंदाज घेतला.