पहुर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर कारमध्ये अत्याचार ; नराधमाला लोंढ्रीच्या जंगलातून अटक

भुसावळ/पहुर : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर कारमध्येच अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडीतेने या संदर्भात दिलेल्या तक्रारीनंतर गणेश शांताराम पवार (27) या तरुणाविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. आरोपीला जळगावातील विशेष न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

फुस लावून पळवत केला अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातील गणेश शांताराम पवार (27) याने पीडित मुलीला शुक्रवार, 18 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता घरातून फूस लावुन पांढर्‍या रंगाच्या चारचाकीतून पळवून नेले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्यावर वाहन थांबून गाडीतच मुलीवर अत्याचार केला. या संदर्भात पीडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी गणेश शांताराम पवार (27) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्रीच आरोपीला अटक
आरोपी गणेश पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पहूरचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तपासचक्रे गतिमान केली. संशयीत आरोपी लोंढ्री जंगलात लपून असल्याची माहिती कळताच उपनिरीक्षक संदीप चेडे, हवालदार विनय सानप, नाईक ज्ञानेश्वर ठाकरे, चालक रवींद्र मोरे आदींच्या पथकाला रवाना करण्यात आल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास त्यास अटक करण्यात आली. आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पीडीतेची बालनिरीक्षण गृहात रवानगी
अल्पवयीन पीडीतेला मंगळवारी महिला बालकल्याण समितीपुढे हजर केल्यानंतर तिची रवानगी बालनिरीक्षण गृहात करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत.