पहूर पेठ ग्रामपंचायतच्या मुख्यजल वाहिनीवरून पाण्याची चोरी

0

पाणी चोरी प्रकरणी पहूर पोलीसस्टेशनला तक्रार

पहूर ता जामनेर ( वार्ताहर ) – पहूर पेठ गावाला पाणीपुरवठा करणार्‍या मोतीआई धरणातील मुख्य जलवाहिनीवरून पाणी चोरी करतांना शेतकर्‍याची पाईप लाईन ग्रामपंचायत पेठ कर्मचार्यांनी पकडली. याबाबत सरपंचांनी पहूर पोलीसात तक्रार दिली आहे.
मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी हिवरखेडा रस्त्यावरील श्रीराम दगडू बारी यांच्या शेतातून गेली असून या जलवाहिनीला बारी यांनी आपल्या शेतातील पाईप लाईनला जोडून गावात जाणारे पाणी विहिरीत उतरविले आहे.या पाण्यावर बारी यांनी चवळीचे पिक काढल्याचे दिसून येत आहे. परीसरात पाणी नसतांनाही, हे शेत हिरवे कसे हे शोधण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तिर्थराज सुरवाडे, शरद नरवाडे,संदीप देशमुख हे गेले असता शेतकर्‍याकडून पाईप लाईनव्दारे पाण्याच्या चोरीचा गंभीर प्रकार निदर्शनास आला असून जवळपास दहा बारा वर्षांपासून हि पाणी चोरी होत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.
प्रत्यक्ष सरंपचपती रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी, सी.एच वाघमारे उपसरपंच रवींद्र मोरे,भारत पाटील यांनी पाहणी करून पोलीस पंचनामा केला असून पोलीसात तक्रार दिली आहे.

८० अनधिकृत नळ कनेक्शन केले बंद
पेठ गावात गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या गल्लीवर तसेच इतर ठिकाणी मुख्यजल वाहिनीवरून अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याने गावात पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत होती. यासाठी पेठ ग्रामपंचायतच्यावतीने सरंपच निता रामेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे,व ग्रामपंचायत सदस्यांनी अनाधिकृत नळकनेक्शन तोडणी धडक मोहीम राबविण्यात सुरवात केली आहे. आतापर्यंत ८०अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यात आली आहे.

पहूर पेठ गावाला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पेठ गावातील मुख्य जल वाहिनीवरील असलेले अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. तसेच मोतीआई धरणातून मुख्य जलवाहिनी वरून जवळपास दहा वर्षापासुन पाणी चोरीचा प्रकार सुरू असून आज उघडकीस आला असुन याबाबत पहूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निता रामेश्वर पाटील
सरंपच पहूर पेठ