पहूर येथील आयडीबीआयच्या एटीमला जागा मालकाचे कुलूप

0

*सेवा मिळत नसल्याने ग्रहकांची मात्र अडचण
*अन्य एटीएममध्ये रोकड मिळेना
*करारानुसार भाडे मिळत नसल्याने कुलूप ठोकल्याची जागा मालकाची माहिती
पहूर – महिनाभराचे भाडे थकल्याने व करारानुसार भाडे मिळत नसल्याने जागा मालकाने आयडीबीआय बँकेच्या एटीमला कुलूप ठोकल्याचा प्रकार पहूर येथे समोर आला आहे. दरम्यान, हे एटीएम बंद असल्याने व अन्य एटीममध्ये रोकड नसल्याने ग्राहकांना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे व बँकांच्या सेवांविषयी ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

बँकेकडून भाड्यामध्ये कपात
औरंगाबाद -जळगाव महामार्गा लगत बँकेचे एटीएम आहे. खाजगी एजन्सी कंपनी कडून याचे व्यवस्थापन केले जाते पण आय.डी.बीआय बँक पहूर प्रशासनाचे यावर नियंत्रण आहे. जागा मालक शेख सलीम शेख गणी व खाजगी एजन्सी कंपनी या दोघांच्या समंतीने झालेल्या करारा नुसारच एटीएम ला जागा दिली आहे. मासिक भाडे ठरल्यानुसार चार हजार आहे. थकित तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचे भाडे दिले असून एका महिन्यांचे भाडे येणे बाकी आहे. तसेच ठरलेल्या भाड्यात एजन्सी कंपनी कपात करून तीन हजार चारशे भाडे देत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी दहा टक्के भाड्यात वाढ सांगितली आहे. वाढपण मिळत नाही. व भाडे कपात केले जात असून तेही वेळेवर मिळत नसल्याने अखेर सलिम यांनी एटीएमला कुलूप ठोकले आहे.

एटीएममध्ये ठणठणाट
पहूर राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून याठिकाणी युनियन बँकेचे एक एटीएम, एसबीआय चे दोन, अँक्सिस बँक चे एक व आय डि.बी आय.बँकेचे एक असे पाच एटीएम असल्यावरही तीन दिवसांपासून यांची एटीएमसेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहक वर्गांमध्ये बँकेच्या सेवांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून ग्राहकांना आयडीबीआय बँकेच्या एटीएमची सेवा मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांना मध्ये भावना व्यक्त होत आहे. तसेच एरव्ही या एटीएम वर ग्राहकांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याची बँक प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी ग्राहक वर्गात तून होत आहे.

– कोट
या एटीएम चे व्यवसथापन खाजगी एजन्सी कंपनी कडून केले जाते. एटीएम लवकरच सुरु करण्यासाठी बँक प्रशासनाच्या स्तरावरून पाठपूरावा केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
– मणिष राऊत, व्यवस्थापक आय.डी.बी.आय.बँक शाखा पहूर

ठरलेल्या भाड्यानुसार एजन्सी कडून मासिक भाडे मिळत नाही. दरवर्षी दहा टक्के वाढ देण्याचे कबूल केल्यावरही वाढतर सोडाच पण मासिक भाड्यात कपात केली जात आहे. थकित तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचे भाडे मिळाले असुन एक महिन्याचे बाकी आहे. याचासंपूर्ण व्यवहार माझा भाऊ सांभाळतो.
– शेख सलीम शेख गणी जागा मालक पहूर