पहूर । बसस्थानक पिरसरात पोलीस चौकीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या इंडियन टेलर या दुकानातून सुमारे 90 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. बसस्थानक परिसरात कृषी पंडीत मोहनलाल लोढा व्यापारी संकूलात समाधान भागवत फरकांडे यांचे इंडियन टेलर हे टेलरींगचे दुकान आहे. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानचे कुलूप तोडून 73 हजार रुपये रोख, 12 हजार किमतीच्या दोन शिलाई मशिन तसेच दिड हजार रुपये किमतीचे 5 ड्रेस असा सुमारे 90 रुपयांचा ऐवज लंपास करुन पोबारा केला.
गुन्हा नोंदविण्यास दिरंगई
घटनास्थळी पोलीस अधिकार्यांची प्रत्यक्ष भेट देऊनही नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर दुकाना शेजारी असलेल्या महालक्ष्मी इलेक्ट्रॉनीक्स दुकानदाराने आपल्या दुकानाच्या संरक्षणासाठी समोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसविला असून यात सदर सीसीटीव्ही फूटेज व्हॉटअॅपवर व्हायरल करण्यात आल्यावर ही पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमीका घेत आहे.
बसस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरा केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचे चित्र आहे. चोर्या थांबण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुरु असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी पहूर पोलीस ठाण्यातर्फे बसस्थानक चौकात चोर्यांवर आळा घालण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र ते सुरु आहेत की बंद आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे जर सुरु असते तर चोरी पकडण्यास निश्चितच मदत झाली असती. मात्र एवढा खर्च करुन लावलेले कॅमेरे शोभेच्या वस्तू ठरत आहे.
पोलीसांची दिरंगाई
पोलीस ठाण्यात चार वेळा जावूनही गुन्हा दाखल न झाल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस जनतेच्या रक्षणासाठी आहेत हा विश्वास पोलीसांनी निर्माण करायला हवा मात्र अशा घटनांतून पोलीसांबद्दल संताप व्यक्त होत आहे.
– समाधान फरकांडे (टेलर)